जळगाव – तालुक्यातील किनोद गावाच्या प्रियांका सूर्यवंशी ह्या २०१७ साली गावाच्या लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. दिनांक १५/०२/२०२१ रोजी त्यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव पारित करण्यात आला होता. सदर अविश्वास ठरावास मान्यता देण्यासाठी दिनांक २९/१०/२०२१ रोजी विशेष ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सर्व ग्रामस्थांनी मतदान करून आपला मतदानाचं हक्क बजावला होता. एकूण ६४५ मतदान यावेळी झाले होते त्यात १५१ मतदान हे बाद घोषित करण्यात आले होते. तसेच २८५ मतदान हे अविश्वास ठरावाच्या बाजूने व २०९ मतदान अविश्वास ठरावाच्या विरोधात झाले होते. म्हणजेच ग्राम सभेतही अविश्वास ठराव हा याचिकाकर्त्या सरपंच यांच्या विरोधात गेला होता.
सदर अविश्वास ठरावाच्या विरोधात याचिका कर्त्या सरपंच यांनी जिल्हाधिकारी यांच्या समोर ग्राम पंचायत अधिनियम १९५९ च्या कलम ३५ (३)(ब ) अन्वये विवाद अर्ज दाखल केलेला होता. सदरील विवाद अर्ज मा. जिल्हाधिकारी जळगाव यांनी फेटाळून अविश्वास ठराव कायदेशीर असल्याचे आपल्या निकालात म्हटले होते.
मा. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या दिनांक ०६/०१/२०२२ रोजीच्या निकालाने व्यथित होऊन याचिकाकर्त्या सरपंच यांनी औरंगाबाद हाय कोर्टात रीट याचिका दाखल केली होती. सदर याचिकेत काल दिनांक ०२/०२/२०२२ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे सुनावणी होऊन मा. जिल्हाधिकारी जळगाव यांनी दिलेल्या दिनांक ०६/०१/२०२२ रोजीच्या निकालास स्थगिती दिली आहे व प्रकरण अंतिम निकालासाठी २ आठवडयांनी ठेवले आहे. याचिकाकर्त्या सरपंच यांच्या वतीने एडव्होकेट जितेंद्र पाटील यांनी काम पहिले. मे . हाय कोर्टाने संपूर्ण प्रक्रियेस स्थगिती देऊन किनोदच्या लोकनियुक्त सरपंच यांना मोठा दिलासा दिला आहे.











