किर्तन थांबवत महाराजांवर हल्ला, बाळासाहेब थोरात यांच्या PAसह 14 जणांवर गुन्हा

0
38

संगमनेर -: तालुक्यातील घुलेवाडी येथील हनुमान मंदिरात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात शनिवारी मोठा गोंधळ उडाला. कीर्तन सुरू असताना काही लोकांनी अचानक कीर्तनात महाराजाशी वाद घातला.

शिवीगाळ केली व वाहनाचे नुकसान केल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. तसेच कीर्तनातील गोंधळाचे काही व्हीडीओ ही व्हायरल झाले आहेत. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी एकूण 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

श्रावण महिन्याच्या निमित्ताने 13 ते 20 ऑगस्टदरम्यान आठवडाभर हा धार्मिक कार्यक्रम सुरू होता. मात्र चौथ्या दिवशी म्हणजे 16 ऑगस्ट रोजी रात्री निलेश दगडू गायकवाड यांनी अचानक कीर्तनात गोंधळ घातला. त्याच्यासोबत वैभव दगडू गायकवाड, घुलेवाडी गावचे काँग्रेसचे उपसरपंच अनिल बबन राऊत, तुळशीराम हरिश्चंद्र दिघे यांच्यासह 8 ते 10 जणांनी ह.भ.प. संग्रामबापू महाराज भंडारा यांना शिवीगाळ केली.

काही मिनिटे गोंधळ सुरू राहिल्यानंतर शेकडो भाविकांच्या उपस्थितीत कीर्तन थांबवावे लागले. त्यानंतर महाराजांचे समर्धक स्वरूप राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून 14 जणांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 131,300,198 (2 ) 190,351(2 ) 352, 324 (4 ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने संगमनेर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे

 

दरम्यान, काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी वारकरी कीर्तनकारावर केलेल्या या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले म्हणाले, वारकरी कीर्तनकारावर झालेला हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नसून संतपरंपरा वारकरी भावना आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेवर केलेला आघात आहे. याचे उत्तर काँग्रेस आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना जशास तसे देण्यात येईल.

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला. थोरात यांचे पीए व कार्यकर्त्यांनी महाराजांच्या गाडीची तोडफोड करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला.महाराष्ट्रातील बाळासाहेब थोरात यांचा सुसंस्कृत चेहरा उघड झाला आहे. किती खालच्या पातळीवर राजकारण केले जात आहे. हे यातून दिसते. पराभव स्वीकारून जनतेत जाण्याऐवजी धमक्या देण्याची प्रवृत्ती आता संगमनेरात सहन केली जाणार नाही असे खताळ म्हणाले.

तर काँग्रेसने काढलेल्या एका परिपत्रकात सर्व आरोप फेटाळले. संग्रामबापू महाराज सातत्याने कीर्तनात हिंदू-मुस्लिम द्वेष निर्माण होईल अशी विधाने करत होते. त्यावर उपस्थित निलेश दगडू गायकवाड यांनी महाराजांनी अध्यात्मावर बोलावे अभंग सांगावा अशी विनंती केली. पण महाराजांनी निलेश दगडू गायकवाड अपमान करत त्यांना सायको असल्याचे म्हटले.त्यामुळेच गोंधळ झाला. मात्र जीवघेणा हल्ला किंवा वाहनफोडीची घटना घडलेली नसल्याचही या परिपत्रकात म्हटलय.

दरम्यान, संग्रामबापू महाराज भंडारे यांच्यावर माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या स्वीय सहाय्यक व सोबतच्या काही लोकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने उद्या निषेध व रास्ता रोको आंदोलन संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.

Spread the love