प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – येथून जवळच असलेल्या कुऱ्हा पानाचे येथील ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी झालेल्या गुप्त मतदाना नंतर सरपंच पदाची माळ दुर्गाबाई शिंदे यांच्या गळ्यात पडली. त्यांना १० तर प्रतिस्पर्धी उमेदवाराला ७ मते मिळाली. सत्ताधारी गटातील ९ पैकी काही सदस्यांचे दुर्गाबाई शिंदे यांना सरपंच पदासाठी विरोध असल्याने विरोधी गटातील ८ सदस्यांना माजी सरपंच जे पी पाटील यांनी खेचून आणून दुर्गाबाई शिंदे यांना सरपंच पद मिळवण्यात यश मिळवले. यामुळे ही सत्तापालट झाली.कुऱ्हे पानाचे येथील ग्रामपंचायतीमध्ये बुधवारी सरपंच निवड प्रक्रिया पार पडली. सकाळी १० ते १२ या वेळेत विलास रंदाळे व दुर्गाबाई शिंदे या दोघांनी सरपंच पदाचे अर्ज दाखल केले. यानंतर दुपारी २ वाजता सदस्य विलास रंदाळे यांनी गुप्त मतदान प्रक्रिया व्हावी अशी मागणी केली. त्यानुसार गुप्त मतदान घेण्यात आले. त्यात दुर्गाबाई शिंदे यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी प्रवीण पाटील, तलाठी दामिनी महाजन, प्रकाश अहिर यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामविकास अधिकारी संतोष मोरे, लिपीक राजू पाटील, संदीप बारी यांनी सहकार्य केले. दरम्यान, कुऱ्हे पानाचे येथे ग्रा.पं. सदस्य संख्या १७ आहे. त्यात ९ विरुद्ध ८ असे सत्ताधारी व प्रतिस्पर्धी गटांची संख्या होती. पहिल्या दोन टप्प्यात ९ सदस्य असलेल्या गटाकडे सरपंचपद राहिले. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील उपसरपंच पद विरोधी गटाकडे गेल्याने ही निवडणूक कोण जिंकते? याकडे सर्व गावाचे लक्ष होते.
एकाच रात्रीतून फिरले चक्र
आठ सदस्य असलेल्या विरोधी गटाकडे सरपंच पदासाठी पुरेशी सदस्य संख्या नव्हती. तसेच सत्ताधारी गटाकडे सुद्धा ठरलेला उमेदवार सरपंच व्हावा यासाठी इतरांचा पाठिंबा नव्हता. त्यामुळे या पंचवार्षिकमध्ये पाहिले सरपंच जे पी पाटील यांनी सुरुवातीला ठरलेले शेवटच्या सरपंच पदासाठीचे उमेदवार दुर्गाबाई शिंदे यांच्यासह विरोधी गट गाठला. त्या बाजूने सरपंचपद खेचून आणले. त्यामुळे सत्ताधारी गटाचे उमेदवार विलास रंदाळे यांना ७, तर दुर्गाबाई शिंदे यांना १० मते मिळाली.
निवडणूक आणि राजकारण म्हटले की आरोप प्रत्यारोप होतात तसेच एक जिंकतो एक हरतो परंतु चढाओढीच्या राजकारणात गावाचा विकास व्हावा अशी अपेक्षा ग्रामस्थांनी केली आहे.