उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचारामुळे सध्या देशात मोठ्या प्रमाणात तणाव असून अनेक ठिकाणी उद्रेक पहायला मिळत आहे. विरोधकांकडून याप्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाला अटक केल्याची मागणी केली जात असताना अजय मिश्रा मात्र आपला मुलगा त्यात सहभागी नव्हता असं सांगत आहेत. कार आपल्याच मालकीची आहे याची कबुली देताना अजय मिश्रा यांनी गाडीवर दगड, विटांचा हल्ला झाल्याने ताबा गेला आणि ही दुर्घटना झाली असा दावा केला आहे. दरम्यान याप्रकरणी अनेक व्हिडीओ समोर येत असून वेगवेगळे दावे केले जात आहे. त्यातच या घटनेचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत काळ्या रंगाची एसयुव्ही वेगाने धावत असून निशस्त्र असणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडून पुढे जात असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओची सत्यता पडताळण्यात आलेली नाही.
केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात लखीमपूरमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राच्या ताफ्यातील वाहनांनी चिरडल्यानंतर हिंसाचार उफाळला. वाहनांखाली चिरडलेल्या चार शेतकऱ्यांसह या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला. त्याचे देशभर तीव्र पडसाद उमटले. यानंतर विऱोधकांकडून घटनेचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. त्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हिडीओत अजय मिश्रा यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे गाडीवर दगड, विटांचा हल्ला होताना दिसत नाही. याउलट चालकाकडे गाडीता ताबा असून अत्यंत वेगात पळवत त्याने शेतकऱ्यांना चिरडल्याचं दिसत आहे.
देशातील शेतकऱ्यांवर नियोजनबद्ध हल्ला
देशातील शेतकऱ्यांवर नियोजनबद्ध हल्ला करण्यात येत असून, देशात लोकशाही नव्हे, हुकूमशाही सुरू असल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केली. राहुल यांनी प्रियंका गांधींसह लखीमपूर खेरी येथे जाऊन मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
लखीमपूरला जाण्याआधी राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन भाजपला लक्ष्य केले. शांततेने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडले जात आहे. या प्रकरणातील संशयित केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या मुलावर कारवाई झालेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनऊला गेले, पण ते लखीमपूर खेरीला गेले नाहीत, हा केंद्र सरकारचा अहंकार आहे, असे राहुल म्हणाले.
लखीमपूरमध्ये कलम १४४ अन्वये जमावबंदी लागू करण्यात आली असली तरी पाचपेक्षा कमी जणांना तिथे जाऊन मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यात काय हरकत आहे, असा सवाल राहुल यांनी केला. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल मंगळवारी एकटेच लखनऊला पोहोचले होते. मग, त्यांना का अडवले गेले? असा सवाल करत इतर दोन पक्षांच्या नेत्यांना घटनास्थळी जाऊ देण्यात आले, याकडेही राहुल यांनी लक्ष वेधले.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकार ठिकठिकाणी समारंभ आयोजित करत असून, त्याअंतर्गत कार्यक्रमासाठी पंतप्रधान मंगळवारी लखनऊमध्ये आले होते. मात्र, उत्तर प्रदेशात असूनही मोदींनी आपल्या भाषणात लखीमपूरमधील हत्याकांडाचा उल्लेख केला नाही. त्याचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, ‘केंद्र सरकारला शेतकऱ्यांची ताकद कळलेली नाही. देशभर केंद्रातील सत्ताधारी लूट करत आहेत. आधी भूसंपादन कायदा आणण्याचा प्रयत्न झाला, आता तीन शेतकरीविरोधी कायदे आणले गेले आहेत.’
केंद्र सरकारवर दबाव आणल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातही आम्ही (काँग्रेस) दबाव आणला म्हणून आरोपीला अटक झाली. अन्यथा, ते मोकाट सुटले असते. आताही शेतकऱ्यांना चिरडणाऱ्यांवर कारवाईसाठी केंद्र व राज्य सरकारवर दबाव आणावा लागेल. केंद्र व राज्य सरकारांकडून सातत्याने अडवणूक केली जात असून हे अडथळे आणण्याचे धोरण फारकाळ चालणार नाही, असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला.












