लखीमपूर-खेरी येथील शेतकऱ्यांना चिरडण्याची घटना, हा पूर्वनियोजित कट असल्याचा अहवाल ‘एसआयटी’ने दिल्यानंतर संसदेत बुधवारी याचे तीव्र पडसाद उमटले. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधी पक्षांनी गदारोळ केला. तर खासदारांच्या निलंबनावरून विरोधकांनी राज्यसभेत गोंधळ घातल्याने दोन्ही सभागृहांचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आले आहे. ‘एसआयटी’च्या अहवालाची संसदेत चर्चा व्हावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.
सकाळी संसदेचे कामकाज सुरू होताच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लखीमपूर-खेरी प्रकरणावरून स्थगन प्रस्ताव मांडला. त्यामुळे सरकारने अजयकुमार मिश्रा टेणी यांना मंत्रिपदावरून हटवावे, अशी मागणी अधीररंजन चौधरी यांनी केली. शेतकरी कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी आंदोलनावेळी हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता.मोदीजी, पुन्हा माफी मागण्याची वेळ
लखीमपूर-खेरी येथील हिंसाचार हा पूर्वनियोजित कट होता, असा अहवाल ‘एसआयटी’ने दिल्याचे राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘मोदीजी, पुन्हा माफी मागण्याची वेळ आली आहे. मात्र, आधी आरोपीच्या वडिलांना मंत्रिपदावरून हटवा. सत्य बाहेर आले आहे,’ असे ट्विट केले आहे.











