मुंबई -: राज्यातील सर्वच जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकं नेमण्यात आली असून मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातही पोलिसांकडून नाकाबंदी व वाहनांची तपासणी केली जात आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्यातील खेड शिवारात कोट्यवधींची रोकड पोलिसांकडून हस्तगत करण्यात आली होती. तर, जळगावमध्येही पोलिसांनी रोकड जप्त केली होती. त्यानंतर, बीडच्या अंबाजोगाईमध्ये रस्त्यावरून जात असलेल्या एका महिलेच्या हातातील पिशवीची तपासणी केली असता त्यात तब्बल 18 लाख रुपये आढळून आले आहे.
विशेष म्हणजे ही महिला घरकाम करणारी आहे. निवडणूक काळात गैरप्रकार रोखण्यासाठी अंबाजोगाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस गस्त घालत होते. यादरम्यान शहरातील गुरुवार पेठ ते मंगळवार पेठ या रस्त्यावर जात असलेल्या एका महिलेला थांबवून पोलिसांनी चौकशी केली. तसेच तिच्याकडील पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये 18 लाख रुपयांची रक्कम आढळून आली आहे. फरजाना बाबाखान पठाण असं या महिलेचे नाव असून तिच्याकडे अधिक चौकशी सध्या पोलीस करत आहेत.
जळगाव शहरात 25 लाखांची रोकड जप्त
जळगावातील शनिपेठ पोलिसांनी एका व्यक्तीकडून 25 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. या रोकड संदर्भात संबंधित व्यक्तीने योग्य ती माहिती न दिल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. प्रमोद हिरामण पवार असं ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 500, 200 तसंच 100 च्या नोटांची सुमारे 25 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. ही रोकड तो एका निळ्या रंगाच्या हॅन्डबॅगमध्ये घेऊन जात होता. जळगाव शहरातील बोहरा गल्ली परिसरात गस्तीवर असलेल्या शनिपेठ पोलिसांच्या पथकाने त्याला अडवलं. बॅगेत काय आहे अशी विचारणा केल्यावर त्याने मी शेतकरी आहे. माझ्याकडे खूप शेती आहे. मी जळगावात सोने घ्यायला आलेलो होतो. असं कारण सांगितलं.
परंतु त्याच्या ताब्यात असलेल्या रोकड संदर्भात त्याने पोलिसांना ठोस माहिती दिली नाही. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन शनिपेठ पोलीस ठाण्यात आणलं. प्रमोद पवार या व्यक्तीची सखोल चौकशी सुरू आहे. त्याने एवढी रक्कम कुठून आणली, ही रक्कम तो कुठे घेऊन जात होता, या संदर्भातील माहिती घेण्याचं काम सुरू असल्याची माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी दिली.