जळगाव – रशिया देशातील सेंट पीटर्सबर्ग नजीक नदीत जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तीन विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी हे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील रहिवासी आहेत.
तर तिसरा विद्यार्थी भडगाव येथील असल्याची माहिती आहे. जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीदेखील या घटनेला दुजोरा दिला आहे. मृत विद्यार्थी रशियातील सेंट पीटर्सबर्गमधील नॉबबोर्ड या विद्यापीठाचे वैद्यकीय शिक्षण घेत असल्याची प्राथमिक माहिती आहे. 4 जून रोजी संध्याकाळी सेंट पीटर्सबर्ग जवळ असलेल्या वॉलखोप या नदीत पाय घसरून तीनही जण बुडाल्याची माहिती आहे.
जिया फिरोज पिंजारी, जी शान अशपाक पिंजारी आणि हर्षल देसले अशी जळगाव जिल्ह्यातील मयत विद्यार्थ्यांची नावे आहेत. तिघांपैकी हर्षल देसले या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला असून इतर विद्यार्थी अद्याप बेपत्ता असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
रशिया येथील प्रशासन आणि पोलीस यांच्यावतीने भारतीय दूतावासाला या घटनेबाबत कळविण्यात आलं आहे. भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना माहिती कळवून मयत विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधला आहे. चार विद्यार्थ्यांच्या मृत्यूने जळगाव जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. हर्षल देसले या विद्यार्थ्यांचा मृतदेह भारतात पाठवण्यासाठी रशियाची कायदेशीर प्रक्रिया सुरु केली आहे.
नेमकं काय घडलं?
यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीज मध्ये वैद्यकीय शाखेत शिकत असलेले जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थी वोल्खोव्ह नदीच्या किनारी शहराच्या समुद्रकिनाऱ्याजवळ फेरफटका मारत होते. त्यावेळी लाट येऊन त्यांचा त्यात बुडून मृत्यू झाला असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रशिया येथील दुतावासातील कुमार गौरव (आय.एफ.एस ) यांच्याशी संपर्क करून सर्व सर्व माहिती जाणून घेतली. तसेच निवासी जिल्हाधिकारी सोपान कासार यांनी पालकांना तिथल्या प्रशासनाशी संपर्क करून दिला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हर्षल अनंतराव देसले (भडगाव) , जिशान अश्पाक पिंजारी, जिया फिरोज पिंजारी (अमळनेर) येथील विद्यार्थी रशियाच्या यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीज मध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होते. हे तिघे आणि त्यांचे सहअध्यायी विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाच्या मोकळ्या वेळेत संध्याकाळी वोल्खोव्ह नदीच्या किनारी शहराच्या समुद्रकिनाऱ्याजवळ फेरफटका मारत होते. त्यावेळी ही शोकांतिका अपघाती आणि अनपेक्षित घडल्याचे कळते.
दोन्ही मयत जिशान अश्पाक पिंजारी आणि जिया फिरोज पिंजारी
सध्या रशियन फेडरेशनमधील सर्व संबंधित एजन्सीं पुढील कार्यवाही करत आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने विदेश मंत्रालयाशी संपर्क करून रशियातील भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क केला. भारतीय दुतावासाने संबंधित विद्यापीठाशी संपर्क करून माहिती जाणून घेतल्याचे सांगितले असून पुढील कार्यवाही सुरु आहे. पालकांना पूर्ण ते सहकार्य करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाने भारतीय दुतावासच्या अधिकाऱ्यांना केली आहे.