जळगाव :- गेल्या काही दिवसांपूर्वी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातंर्गत तीन जिल्ह्यांच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मंडळ कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. काही दिवस उलटत नाही तोच येथील कर्मचाऱ्यांनी कार्यालयात भरदिवसा ओली पार्टी केल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. कार्यालयात दारू पिणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत.
जळगाव येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकारण कार्यालयाचे जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यासाठी विभागीय कार्यालयाचा शुभारंभ काही दिवसांपुर्वीच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आला होता. तीन कर्मचारी कार्यालयातच चक्क दारू पित असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
या व्हिडीओमध्ये शासकीय तीन कर्मचारी एकाच टेबलावर दारूची बाटली, सोड्याची बाटली, दारूने भरलेले ग्लास आणि खाद्यपदार्थ वगैरे दिसून येत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली असुन भरदिवसा कार्यालयातच मद्यपार्टी करणार्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
दरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गंभीर दखल घेतली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून दारू पिणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.