महाकुंभ मेळ्यात सिलिंडर स्फोटामुळे १८ तंबूंमध्ये भीषण अग्नीतांडव; मुख्यमंत्री आदित्यनाथ घटनास्थळी दाखल!

0
48

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभ मेळ्याला भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत.

या आगीचे लोट दूरहून दिसत आहेत. दरम्यान, घटनास्थळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पोहोचले असून ते घटनेची चौकशी करत आहेत.

१८ तंबू भस्मसात

प्राथमिक अहवालांनुसार, कॅम्प साइटवर आग लागली आणि त्या भागात बसवलेल्या अनेक तंबूंना या आगीने वेढले. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) चे एक पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. आग विझवण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. या आगीत १८ तंबूंना आग लागली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रमोद शर्मा इंडियन एक्स्प्रेसला म्हणाले, महाकुंभमध्ये सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागली आहे. तर, प्रयागराज झोनचे एडीजी भानू भास्कर इंडिया टुडेला म्हणाले, महाकुंभमेळ्याच्या सेक्टर १९ मध्ये दोन-तीन सिलिंडरचा स्फोट झला. त्यामुळे कॅम्पमध्ये मोठी आग लागली. आगीवर नियंत्रण मिळण्यात आले आहे. सर्व लोक सुरक्षित आहेत आणि कोणीही जखमी झालेले नाही.

“महाकुंभमेळ्याच्या सेक्टर १९ मध्ये दोन सिलिंडरचा स्फोट होऊन शिबिरांमध्ये मोठी आग लागली. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत”, असे आखाडा पोलिस स्टेशनचे प्रभारी भास्कर मिश्रा यांनी सांगितले.

Spread the love