ममुराबाद-:ग्राहकाने वापरलेल्या विजेचा पुरेपूर मोबदला वसुलीचा अधिकार वीज पुरवठादार महावितरण कंपनीला असला, तरी वीज कायद्याचा भंग करून वीजबिलांची थकबाकी असलेल्या ग्राहकांवर वीजपुरवठा तोडण्याची कारवाई सध्या सुरु आहे.
आर्थिक वर्षांचा शेवटचा महिना असल्याने वीजबिलांची थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा तोडण्याची जोरदार कारवाई महावितरणकडून या महिन्यात करण्यात येत आहे. वीजबिलाची थकबाकी असलेल्या ग्राहकाचा वीजपुरवठा तोडायचा असल्यास वीज कायद्यानुसार संबंधिताला पंधरा दिवसांची नोटीस देणे बंधनकारक आहे. त्याशिवाय वीज तोडण्याची कारवाई करता येत नाही. संबंधित थकबाकीदाराने नोटीस दिल्यानंतरही पंधरा दिवसात वीजबिल भरले नाही, तर त्याचा वीजपुरवठा खंडीत करता येतो व तो पुन्हा पूर्ववत करण्यासाठी अतिरिक्त शुल्कही आकारण्याचा अधिकार महावितरण कंपनीला आहे. मात्र, कायद्यानुसार अशा प्रकारची कोणतीही नोटीस न देताच थकबाकीदाराचा वीजपुरवठा तोडण्याचे प्रकार ममुराबाद परिसरात सुरु झाले आहेत.
ग्राहकाला दिलेले वीजबिल हीच नोटीस असते, असे काही अधिकाऱ्यांकडून पूर्वी सांगितले जात होते. अशा प्रकारची कोणतीही नोटीस नसते, अशी उत्तरेही ग्राहकांना स्थानिक कर्मचाऱ्यांकडून दिली जात होती. मात्र, वीजबिलाच्या यंत्रणेनुसार एखाद्या महिन्यात संबंधिताने वीजबिल न भरल्यास दुसऱ्या महिन्याच्या बिलासोबत त्याला नोटीस जाणे आवश्यक आहे. मात्र, तसे होत नसल्यानेच कायद्याचा भंग होत असल्याचे प्रकार सध्या सुरु आहेत.
शेतकर्यांचा शेतातील विजपुरवठा खंडीत करू नये अशा प्रकारचे शासनाचे तोंडी आदेश असतांनाही संबधीत महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून शेतीपंपाचा विजपुरवठा खंडीत करण्याचे काम सध्या सुरु आहे. सध्या कापसाच्या शेतीचा भरणा सुरु आहे तसेच गहु पेरणी सुद्धा सुरु आहे. अशातच विजपुरवठा तोडल्याने शेतकर्यांनमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे.










