ममुराबाद(प्रतिनिधी )दुर्गोत्सवाप्रसंगी गरबा दांडिया खेळताना किंवा विसर्जन मिरवणुकीमध्ये अति उत्साहीत न होता सामाजीक सलोख्याचे भान ठेवुन दुर्गोत्सव साजरे करा, उत्साहाच्या भरात काही गैरकृत्य करून गुन्हा दाखल होण्याची नसती आफत ओढवून घेऊ नका, कायदा सुव्यस्था व शिस्तीचे पालन करून सर्व समाजातील नागरिकांनी आपापली जबाबदारी समजून उत्सव साजरा करा, असे आवाहन तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी ममुराबाद ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये आयोजित शांतता समितीच्या बैठकीत केले.

दुर्गादेवी घटस्थापनेच्या व विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी बुधवार सायंकाळी शांतता समितीची बैठक बोलावली होती. या अतिमहत्वाच्या शांतता समितीच्या बैठकीस मुमराबाद ग्रामपंचायत सरपंच हेमंत चौधरी, गावातील दुर्गोत्सव मंडळाचे कार्यकर्ते उपस्थिती होती. बैठकीत पोलीस निरीक्षक कुंभार यांनी,दुर्गोत्सव साजरा करत असताना प्रत्येक मंडळाने गरबा खेळत असताना आपल्यापासून कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करावा,श्री दुर्गोत्सव सन शांततेत पार पडावा उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये गावातील सार्वजनिक शांतता व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आपल्या दुर्गोत्सव मंडळामुळे जनतेला त्रास होणार नाही व दुर्गोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी खाली दिलेल्या निर्देशाचे पालन करावे.
1)दुर्गादेवी उत्साहासाठी टाकण्यात येणाऱ्या मंडपाचा आकार ठरवून दिलेल्या मर्यादेतच असावा.
2)मंडपामुळे सार्वजनिक रहदारीस वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी व नियमांचे पालन करावे. 3)मंडपाचे स्टेज पक्के व मजबूत असावे.
4)श्री दुर्गा देवी मूर्तीचे ऊन,वारा, पाऊस, व मोकाट जनावरे यांच्यापासून संरक्षण होईल याची सर्वतोपरी मंडळाचे पदाधिकारी यांनी काळजी घ्यावी.
5)मंडपासाठी कायदेशीर रित्या विद्युत कनेक्शन घेण्यात यावे. मंडपामध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना करण्यात यावी. त्यासाठी वाळूच्या व पाण्याच्या बदल्या भरून ठेवाव्या.
6)ध्वणी प्रदूषण नियम 2000 अन्वये रहिवासी परिसरात 45 डेसिबल ते 55 डेसिबल पेक्षा जास्त आवाजाची मशीनरी वापरल्यास कायद्याचा भंग होऊन दखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात येईल.
7)बंदोबस्तावरती पोलिसांनी दिलेल्या आदेशांचे पालन करावे.
8)मंडळाची आरास करमणुकीचे कार्यक्रम पाहण्यासाठी गर्दी होणार नाही अशा प्रकारची व्यवस्था करावी.
9)मंडपामध्ये अथवा इतरत्र काही अनोळखी संशयित बेवारस वस्तू उदाहरण. सुटकेस, रेडिओ, मोठे घड्याळ, खेळणी, इत्यादी आढळून आल्यास अगर संशयित व्यक्ती जवळपास फिरताना दिसल्यास ताबडतोब पोलिसांना कळवावे.
10)महत्त्वाच्या व गर्दी होणाऱ्या दुर्गा देवी मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे व त्यांचे रेकॉर्डिंग जतन करावे.
वरील नियमांचा भंग केल्यास आपणाविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल व सदरची नोटीस ही आपल्या विरुद्ध कायदेशीर पुरावा म्हणून मा.न्यायालयात सादर करण्यात येईल.अशा सुचना देवून मार्गदर्शन केले.
त्याचप्रमाणे पोलीस पाटील सौ आशा पाटील यांनी यावेळी उपस्थित दुर्गाउत्सव मंडळाच्या सभासदांना शांततेत दुर्गोत्सव सण साजरा करण्याचे आवाहन केले.
बैठकीवेळी तालुका पोलीस स्टेशनचे माणिक सपकाळे, मनोज पाटील, विश्वनाथ गायकवाड, ज्ञानेश्वर कोळी, यांच्यासह गावातील ग्रामपंचायत उपसरपंच संतोष कोळी,सदस्य अमर पाटील,अनिस पटेल, गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.










