ममुराबाद-गेल्या११ दिवसांपासून मनोभावे उपासना करणाऱ्या सार्वजनिक मंडळांनी गुरुवार रोजी जंगी मिरवणुकीतून आदिशक्ती दुर्गादेवीला निरोप दिला. तरुणांसोबतच ठिकठिकाणी महिला, तरुणींनी आकर्षक गरबा खेळून मिरवणुकीची रंगत वाढवली. सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवणाऱ्या उत्सवाचा शेवटही गोड व्हावा यासाठी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी तगडा बंदोबस्त तैनात केला होता. तब्बल 9 तास ही मिरवणूक चालली.
यंदाच्या नवरात्रोत्सवात गावाने अभूतपूर्व उत्साह अनुभवला. आदिशक्तीची स्थापना झाल्यापासून प्रत्येक सार्वजनिक मंडळाने सांस्कृतिक, धार्मिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम देखाव्यांवर भर दिला. या उत्सवाचा शेवटही अतिशय उत्साहात करण्यासाठी मंडळांनी दोन दिवसांपासून नियोजन केले होते. गुरुवारी दुपारी 3 वाजेपासून ठिकठिकाणी मिरवणुकीस सुरुवात झाली. मंडळांनी स्वतंत्रपणे वाजत-गाजत तापी नदी गाठून तेथे मूर्तीचे विसर्जन केले. दरम्यान,गुलाल फुलांची उधळण झालेल्या सार्वजनिक मिरवणुकीस दुपारी 3 वाजता स्थापनेच्या ठिकाणा पासून सुरुवात झाली. त्यात पाेलिसांची परवानगी घेतलेल्या 16 दुर्गोत्सव मंडळांचा सहभाग होता. ही मिरवणूक रात्री उशिरापर्यंत तापी नदीवर पोहोचली.
रस्ता केला मोकळा तालुका पोलीस स्टेशनचे माणिक सपकाळे यांनी मिरवणुकीच्या मार्गात अडथळा असलेला रस्ता माेकळा केला होता. तसेच मळकी विहीर चोक, जिद्दी वाडा, क्रांती चौक, गावहाळ,लक्ष्मी नारायण मंदिर,ढाके वाडा,मस्जिद, व शिवाजी महाराज चौक, असा मिरवणुकीचा मार्ग ठेवण्यात आला होता.
पोलीसांचा चोख बंदोबस्त मिरवणुकीला सुरुवात होण्याआधी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी मंडळांना शांततेत मिरवणूक पार पाडण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी तालुका पोलीस स्टेशनचे माणिक सपकाळे,सुधाकर शिंदे, रामकृष्ण इंगळे,जयश्री मालखेडे, होमगार्ड शांताराम पाटील, अधिकारी सुरवाडे, राकेश पाटील आदि कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात होता.
सार्वजनिक मंडळांनी केला वाजंत्रीवर सात ते आठ लाखाचा खर्च,
प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाजंत्री च्या बाबतीत ओढाताण असल्याने वेगवेगळ्या जिल्ह्यातून तसेच तालुक्यातून बँड पथक मागवले होते,बँड पथकांच्या शाई पोटी जवळपास सात ते आठ लाख रुपये खर्च करून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बँड पथकामध्ये नाचत आनंद घेतला.कोरोना काळामध्ये सतत दोन वर्ष दुर्गोत्सव झालेला नसल्यामुळे ह्या वर्षी मोठ्या उत्साहात दुर्गोत्सव साजरा झाल्याने व मंडळांना दुर्गोत्सव साजरा करताना पोलिसांकडून मिळालेल्या सहकार्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांचे देखील आभार मानले.










