जळगाव -तालुक्यातील ममुराबाद येथे अति पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावे या मागणीसाठी दिनांक 20 रोजी येथील शेतकऱ्यांनी माननीय गुलाबराव जी पाटील पालक मंत्री, मा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मा तहसीलदार यांना निवेदन दिले आहे .याबाबत सविस्तर वृत्त असे की ममुराबाद येथे एकाच दिवशी 80 मिली पेक्षा जास्त प्रमाणात पाऊस पडल्याने येथील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हाती खरीप हंगाम उडीद, मूग, पूर्व हंगामी कापूस, सोयाबीन, याची पेरणी झालेली असल्याने अतिपावसामुळे सर्व पिके खराब झाली आहे, त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे. सदर बाबीवर प्रशासनाने मात्र दुर्लक्ष केल्याने ममुराबाद शिवार सोडून इतर शिवारात पीक पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत. एकाच दिवशी 80 मिली पेक्षा जास्त प्रमाणात पाऊस पडलेला असताना देखील परिस्थितीचा आढावा घेतला न गेल्याने येथील शेतकऱ्यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.प्रशासनाने ममुराबाद शिवारात पिकांचे पंचनामे करण्याचे लवकरात लवकर आदेश द्यावेत व शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा आढावा घेऊन जास्तीत जास्त मदत करावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे .












