रावेर – तालुक्यात सकाळपासून तब्बल पाच तास संततधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक घरांत पाणी शिरले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
दरम्यान अजंदेजवळ एक वॅगनर कार वाहून गेली. मात्र पती-पत्नी तत्पूर्वीच उतरल्यामुळे मोठा अनर्थ टळला. रावेर तालुक्यात बुधवारी (ता. १९) सकाळी दहापासून संततधार पावसाला सुरुवात झाली. दुपारी तीनपर्यंत संततधार पाऊस सुरू होता.
दरम्यान, सातपुडा पर्वतातही जोरदार पाऊस झाल्यामुळे गंगापुरी, मात्राण धरण ओव्हरफ्लो झाले आहेत. तालुक्यातील सुकी, अभोरा, भोकर, मात्राण यासह नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. या नद्यांच्या काठावरील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे नुकसान झाले आहे.
या पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून, लुक्यातील सावदा, थोरगव्हाण, रसलपूरसह विविध गावातील नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे पाणी घरात शिरून घरांचे मोठे नुकसान झाले.
प्राध्यापकांचे प्रसंगावधान
नागझिरी नदीला अचानक पूर आल्यामुळे ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालयाचे प्रा. एस. बी. महाजन व त्यांच्या पत्नी अर्चना महाजन हे दोघे आपल्या वॅगनार कारने रावेरहून ऐनपूरकडे जात असताना अजंदे गावाजवळ नदीचे पाणी अचानक वाढल्यामुळे कार पाण्यात असल्यामुळे दोघांनी तत्काळ प्रसंगावधान राखून कारचा दरवाजा उघडून बाहेर सुखरूप आले. मात्र थोड्याच वेळात त्यांची कार नदीच्या पुरात वाहून गेली.
वाहतूक ठप्प
तालुक्यात मुसळधार पाऊस पडल्यामुळे बऱ्हाणपूर – अंकलेश्वर राज्य महामार्गावर वडगाव जवळच्या नाल्याला पाणी आल्यामुळे सुमारे एक ते दीड तास ठप्प झाला होता तर रावेर, अजंदा, निंबोल, विटवा, ऐनपूर, रावेर -नेहेते, दोधे, रावेर भाटखेडा, उटखेडा – चिनवल, उटखेडा कुंभारखेडा, सावदा थोरगव्हाण, अभोडा रावेर, पातोंडी – निंभोरासीम यासह अनेक गावांचा सपर्क तुटला. यामुळे नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे नदीच्या दुतर्फा वाहने अडकून पडली होती.
शेतात पाणी
आज तब्बल साडेचार ते पाच तास पाऊस झाल्यामुळे शेतामध्ये पाणी साचून राहिले आहे. पुन्हा पाऊस आल्यास खरिपांची पिके सडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, शहरातील पाराचा गणपती मंदिर या भागात पाणी साचले होते. तसेच तहसील कार्यालय पोलिस ठाणे या भागातही पाणी साचले होते.