धुळे -: ‘खुनी गणपती’ नाव ऐकून आश्चर्य वाटलं ना? हा आहे धुळ्यातला मानाचा गणपती. धुळ्यातील खुनी गणपतीची विसर्जन मिरवणूक जेव्हा खुनी मशिदीजवळ येते, तेव्हा हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी अवघे धुळेकर खुनी मशिदीजवळ गर्दी करतात. नेमका काय आहे या गणपतीचा इतिहास
1895 साली खांबेटे गुरुजींनी टिळकांच्या प्रेरणेने धुळ्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्या गणेशाची विसर्जन मिरवणूक 1000 वर्ष जुन्या शाही जामा मशिदीवरुन सायंकाळी प्रार्थनेच्या वेळी पालखीतून जात होती. त्यावेळी या पालखीला विरोध झाला आणि या विरोधाचं रुपांतर हाणा-मारीत झालं. यामुळे ब्रिटीशांनी जमावावर गोळीबार केला. त्यात बरेच लोक मृत्युमुखी पडले. अनेक जणं जखमी झाले. यानंतर अनेक उलट-सुटल चर्चा झाल्या. या चर्चांमुळे मशिदीला खुनी मशीद आणि गणपतीला खुनी गणपती नाव प्रचलित झालं.
पुढे ब्रिटीशांनी दोन्ही गटात समेट घडवला आणि एकमेकांच्या धर्माच्या सन्मानासाठी ठोस पाऊल उचललं. ब्रिटीशांकडून 228 रुपये दोन्ही गटांना दिले गेले आणि त्यातून ही ऐतिहासिक प्रथा सुरू झाली. दर अनंत चतुर्दशीला गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतूनच निघते. यावेळी पारंपरिक टाळ-मृदुंगाच्या गजरात तिनपावली, बारापावली नृत्य होतं. सायंकाळी 5 वाजता, म्हणजेच नमाजची अजान होतांना खुनी गणपतीची पालखी खुनी मशिदीच्या दाराच्या एकदम समोर येते. मशिदीतून गणपतीवर पुष्पवृष्टी केली जाते. मशिदीचे मौलाना आरतीचं तबक आणि गुलाबाच्या फुलांचा हार आणून मशिदीतर्फे गणपतीची आरती करतात. एकीकडे आरती आणि दुसरीकडे अजान सुरू असते
‘जामा मशिदीवरुन सायंकाळी प्रार्थनेच्या वेळी पालखीतून जात होती. त्यावेळी या पालखीला विरोध झाला आणि या विरोधाचं रुपांतर हाणा-मारीत झालं. यामुळे ब्रिटीशांनी जमावावर गोळीबार केला. त्यात बरेच लोक मृत्युमुखी पडले. अनेक जणं जखमी झाले. यानंतर अनेक उलट-सुटल चर्चा झाल्या. या चर्चांमुळे मशिदीला खुनी मशीद आणि गणपतीला खुनी गणपती नाव प्रचलित झालं.
या ठिकाणी आल्यानंतर पालखी अचानक जड होत असल्याचाही अनुभव भाविक सांगतात. हिंदू-मुस्लीम ऐक्याची सुंदर परंपरा इथे आहे. आणि दोन्ही धर्मियांनी ती आजतागायत जपलीय. आठ-दहा लाख लोकसंख्या असलेल्या धुळे महानगरात जुने धुळे परिसर सोडलं तर बाप्पाचं हे आगळं रुप जास्त कुणाला माहीत नाही. जुन्या धुळ्यातल्या जुन्या लोकांनी ही प्रथा जपलीय. त्यामूळे हा इतिहास आणि वेगळेपणाचा इव्हेंट होण्यापासून वाचलाय. 1895-96 मध्ये जसं होत होतं… तसंच तंतोतंत आजही पाळलं जातंय. धुळ्यात आल्यानंतर, जुनं धुळं विचारलं की खुनी मशीद हाच बसथांबा आजही आहे. जसं मशिदीच्या प्रशासनाने गणपती जपलाय, तस जुन्या धुळ्याने हिंदूबहूल कॉलनीतली / पेठेतली लोकांनीही मशिदीचं पावित्र्य जपलंय.