ममुराबाद -गावाचे प्रवेशद्वारातून आत आले कि दत्त मंदिराच्या मागच्या बाजुस नजरेस मी पडते. मी बऱ्याच वर्षापासून या ममुराबाद पुण्यभूमीला सेवा देत आहे. अनमोल असे सहकार्य करत आहे. माझ्यात साठवलेले पाणी मी जनतेला पूरवत आहे. त्या पाण्याच्या वापरामुळे बऱ्याच जनतेची तहान भागत आहे. तसेच माझे साठवून ठेवलेले पाणी गावातील सर्व नागरिकांना उपयोगात येत आहे. मात्र काही दिवसांपासूनच माझी बिकट परिस्थिती झाली आहे.
माझा जीव आता दाबायला लागला आहे. माझ्या प्रकृतीत आता बिघाड होत चालाय. माझे पाहिजे तसे वय तर अजून झाले नाही. पण शरीर मात्र साथ देत नाही ते कमकुवत होत असून कमजोरी येत चालली आहे. या शरीराला पहिल्या सारखा जोर मात्र राहिला नाही. शरीराला तारूण्य असतं नंतर वृद्धपणा देखील असतच, पाहिजे तसा वृद्धपणा अजून मला आलेला नाही, मात्र अवयव सैल झाली असून हाड बळकट नाहीय.
दिवसभर मी उभी राहून या पाण्याचा भार डोक्यावर घेत मी कशी तरी उभी आहे. खाली पडणार तर नाही याची भीती खूप मात्र रोज मनात राहते. आजच्या परिस्थितीत तेवढा भार माझ्याकडून पेलला जात नाही. बऱ्याच दिवसापासून माझ्या शरीराचे लचके आता खाली पडायला लागले आहेत. माझे पाय आता इतका भार तोलु शकत नाही पायात मास नसल्यामुळे फक्त हाडच उरलेली आहे .
दिवसभर डोक्यावर ठेवलेले पाण्याचा भार पेलला जात नाही. माझे शरीर निष्क्रिय झाल्याने सहनशीलता ढासळली आहे. म्हणून शरीरातील साचलेल्या त्या पाण्याचे ओझे कधी एकदा खाली होईल याची वाट मी रोज पहात बसते .
तेवढा भार माझ्याकडुन सहन होत नाही. तरीदेखील माझा वापर बळजबरीने केला जात आहे. जसा काही माझ्यावर एकप्रकारे अत्याचार होत असल्याचं जाणवते. तेवढी ताकत राहिली नाही. केव्हाही माझा जीव जाऊन मी खाली कोसळू शकते. यामुळे कुणाची जीवित हानी होऊ नये, यासाठी मला या जागेवरून होईल तेवढे लवकर बाहेर काढा, अशी विनवणी मी करत आहे.
मी मोठ्या आशेने ममुराबाद ग्रामस्थांकडे पहात आहे. कारण नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका झाल्याने नवीन टीम आली असे म्हणतात व ते चांगले काम करतील अशा ग्रामस्थांच्या अपेक्षा आहे. यावर मी ही अपेक्षा करायला काही हरकत नाही, त्यामुळे माझं पुनरूज्जीवन होईल की मी मृत्यूमुखी पडेल यावर सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.