जळगाव-:राष्ट्रवादीचे नेते आ. एकनाथराव खडसे यांनी माझ्या मुलाबाळापर्यंत जाण्याची गरज नव्हती. त्यांनाही मुलगा होता. त्याचे काय झाले ? त्याने आत्महत्या केली की त्याचा खून झाला? हा संशोधनाचा विषय असल्याचे सांगत भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांनी आ. एकनाथराव खडसेंवर पलटवार केला आहे.
जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.जामनेर येथील एका कार्यक्रमात आ. एकनाथराव खडसे यांनी गिरीश महाजनांवर घराणेशाहीवरून टीका केली होती. ते म्हणाले की, गिरीश महाजनांना मुलगा असता तर तोही राजकारणात असता. या विधानाचा मंत्री गिरीश महाजन यांनी चांगलाच समाचार घेतला. मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, खडसेंची परिस्थिती बघता त्यांची मानसिक स्थिती बिघडणे स्वाभाविक आहे. त्यांच्या अनेक ठिकाणच्या भानगडी, चौकशा सुरु आहेत.या चौकशांमध्ये सबळ पुरावे हाती लागू लागले आहेत. म्हणून खडसे अस्वस्थ झाले आहेत. मला दोन मुली असून, मी त्यांना राजकारणात आणले नाही. मला त्याचा आनंद असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.
पण माझा खडसेंना प्रश्न आहे, की त्यांनाही मुलगा होता, त्याचे काय झाले याचे उत्तर त्यांनी द्यावे, त्यांच्या मुलाने आत्महत्या केली की त्याचा खून झाला, हे तपासण्याची गरज आहे. मला जास्त बोलायला लावू नका, यातच खडसेंचे भले आहे असे सांगत खडसेंवर पलटवार केला आहे.