शिवसेनेशी बंडखोरी करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर हे जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करत आहेत असा आरोप करत शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे. त्याच वेळी सुनावणीचे नवे वेळापत्रक नार्वेकर यांच्या वतीने महाधिवक्ता तुषार मेहता हे सादर करतील असे सांगण्यात येते. त्याच संदर्भात नार्वेकर यांनी आज दिल्लीला जाऊन मेहता यांच्याशी चर्चा केली.
राहुल नार्वेकर यांनी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी मुंबई विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी वेळापत्रक बदलाबाबत तुषार मेहता यांच्याकडून कायदेशीर सल्ला घेण्यासाठी दिल्लीला जात असल्याचे त्यांनी सांगितले. राहुल नार्वेकर हे रात्री उशिरा मुंबईत परतले. त्यावेळी त्यांनी तुषार मेहता यांच्याशी झालेल्या चर्चेची प्रसारमाध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले, ‘तुषार मेहता यांची आज भेट घेऊन सुमारे पाऊण तास चर्चा केली. मेहता यांच्याकडून जो कायदेशीर सल्ला घ्यायचा तो घेतला आहे. न्यायालयात आम्ही योग्य ती भूमिका मांडू. न्यायालयाची बाजू लक्षात घेत उद्या योग्य ती भूमिका तुषार मेहता मांडतील.’ असे नार्वेकर म्हणाले.
माझ्यावर दबाव टाकून काम करून घेण्याचा प्रयत्न
आपल्यावर दबाव टाकून काम करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोपही राहुल नार्वेकर यांनी यावेळी केला. अपात्रता सुनावणीत वेळकाढूपणा होत असल्याची टीका होत असल्याबद्दल माध्यमांनी त्यांना विचारले असता या टीका हेतूपुरस्सर होत असल्याची सारवासारव नार्वेकर यांनी केली. आमदार अपात्रताप्रकरणी 30 ऑक्टोबरपर्यंत नवे वेळापत्रक सादर करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना दिल्या आहेत. याप्रकरणी होत असलेल्या विलंबाबद्दल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नार्वेकर यांना दोन वेळा चांगलेच फटकारले होते.