काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी कुख्यात गुंड गजानन मारणे याची भेट घेतली होती. या भेटीची चांगलीच चर्चा रंगली.
या भेटीवरून अनेकांनी टीका देखील केली. खुद्द अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की हे चूक आहे, मी पार्थची भेट झाल्यानंतर त्याला सांगणार आहे. या भेटीची चर्चा सुरू असतानाच आता दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने भेट घेतली आहे. आता या भेटीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
कुख्यात गुंड हेमंत दाभेकर यानं वर्षा निवासस्थानी श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. मिळत असलेल्या माहितीनुसार हेमंत दाभेकर यानं श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीचा फोटो देखील समोर आला आहे. या भेटीची जोरदार चर्चा सुरू असून, या मुद्द्यावर विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.
कोण आहे हेमंत दाभेकर?
हेमंत दाभेकर हा कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याचा अंत्यत जवळचा मानला जातो. शरद मोहोळचा राईट हॅन्ड अशी त्याची ओळख आहे. गुंड किशोर मारणे खून प्रकरणात शरद मोहोळ सोबतच हेमंत दाभेकर हा देखील आरोपी होता, त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.