मोलगीचा लाचखोर हवालदार 11 हजारांची लाच स्वीकारताना जाळ्यात

0
14

नंदुरबार/भुसावळ : चॅप्टर केसमधील तक्रारदाराच्या मुलांची नावे कमी करण्यासाठी तडजोडीअंती 11 हजारांची लाच स्वीकारणार्‍या नंदुरबार जिल्ह्यातील मोलगी पोलीस ठाण्याच्या हवालदाराला नंदुरबार एसीबीच्या पथकाने मोलगी पोलीस ठाण्यातच रंगेहाथ अटक केल्याने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. प्रकाश सीताराम मेढे (43) असे अटकेतील लाचखोर हवालदाराचे नाव आहे.

11 हजारांची लाच भोवली

41 वर्षीय तक्रारदार व त्यांच्या दोन्ही मुलांविरोधात जमिनीच्या वादावरून अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. अदखलपात्र गुन्ह्यातील चॅप्टर केसमध्ये तक्रारदार यांच्या दोन्ही मुलांची नावे कमी करण्यासाठी हवालदार प्रकाश मेढे यांनी 15 हजारांची मागणी केली होती मात्र 11 हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी नंदुरबार एसीबीकडे तक्रार नोंदवली. आरोपीने तक्रारदाराकडून गुरुवारी दुपारी मोलगी पोलीस ठाण्यातील अंमलदार कक्षात लाच स्वीकारताच त्यास पंचांसमक्ष अटक करण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली.

यांनी केला सापळा यशस्वी

हा सापळा नाशिक एसीबीचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक सतीश भामरे, प्रभारी पोलीस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शखाली नंदुरबार एसीबीच्या पोलीस निरीक्षक माधवी समाधान वाघ, हवालदार उत्तम महाजन, हवालदार विजय ठाकरे, नाईक दीपक चित्ते, नाईक अमोल मराठे, महिला पोलीस नाईक ज्योती पाटील आदींच्या पथकाने यशस्वी केला.

Spread the love