केंद्र सरकारने औरंगबादच्या नावाला छत्रपती संभाजी नगर असं नाव करण्यास मान्यता दिली आहे. असं असेल तर मुंबईचं नावही छत्रपती शिवाजी महाराज नगर करा अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत इम्तियाज जलील यांनी ही मागणी केली आहे.
काय म्हटलं आहे इम्तियाज जलील यांनी?
केंद्र सरकारने औरंगाबाद या नावाला छत्रपती संभाजी नगर करण्यास मान्यता दिली आहे. याविरोधात आम्ही न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई सुद्धा लढण्याची तयारी दर्शवली आहे. कोर्टाने २७ मार्चपर्यंत हरकती मागविल्या आहेत. त्या अगोदरच आम्ही मोर्चे आंदोलन काळे झेंडे लावणे या प्रकारचं आंदोलन करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
छत्रपती संभाजी नगर नावाला विरोध नाही पण..
छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध नाही परंतु या सर्व गोष्टीचा भुर्दंड सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट यावरची सर्व नावे बदलावी लागणार आहे. यासाठी महसूल एस.टी. महामंडळ रेल्वे जिल्हा परिषद या सर्वच कार्यालयांमध्ये नावे बदलावे लागतील त्याकरिता खर्च येणार आहे नाव बदलल्याने इतिहास बदलत नाही इतरही शहरं आहेत त्यांची नावं का बदलत नाही? कोल्हापूर पुणे नागपूर यांनाही महापुरुषांची नावे द्या. मुंबईला पण छत्रपती शिवाजी महाराज नगर असे नाव द्या. सध्या अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात ठराव पारित करा कोणीही विरोध करणार नाही असंही इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.
अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराचं नामकरण ‘ छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामकरण’धाराशिव’ करण्याची मागणी करण्यात येत होती. संबंधित दोन्ही शहरांचं नामकरण करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला होता. त्यानंतर राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता. त्यानंतर केंद्र सरकारने दोन्ही शहरांचं नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.