नव्या संसद भवनावर 13 डिसेंबर रोजी झालेल्या स्मोकबॉम्ब हल्ल्याचे तीव्र पडसाद पुन्हा दोन्ही सभागृहांत उमटताना दिसत आहेत. सोमवारी दोन्ही सभागृहांतून तब्बल 78 खासदारांचं निलंबन करण्यात आलं.
त्यात मंगळवारी आणखी भर पडली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचेही निलंबन करण्यात आले आहे. सुप्रिया यांच्यासह डॉ. अमोल कोल्हे, मनिष तिवारी, कार्ती चिदंबरम, डिंपल यादव, दानिश अली, शशी थरूर अशा एकूण 49 खासदारांचे निलंबन मंगळवारी करण्यात आलं आहे.
सोमवारी सुरक्षेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरलं होतं. संसदेच्या सुरक्षेत चूक झाल्याची जबाबदारी अमित शहा यांनी स्वीकारावी आणि राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. त्यानंतर सभापतींनी कारवाईचा बडगा उगारत लोकसभेतून 33 आणि राज्यसभेतून 45 खासदाराचं निलंबन केलं होतं. त्यात मंगळवारी आणखी काही खासदारांची भर पडली. मंगळवारी दोन्ही सभागृहातील मिळून 141 खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. या संपूर्ण गदारोळात लोकसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे.
या सरकारला विरोध नकोच आहे. विरोधी पक्षाला हद्दपार करण्यात येत आहे. संसदेतील हल्ल्यासंबंधी गृहमंत्र्यांनी निवेदन करावं इतकीच आमची मागणी होती. पण या सरकारला चर्चा करायची नसल्याने ही दडपशाही आहे. लोकशाहीचा आवाज दाबण्याचं पाप आहे. हे अतिशय दुर्दैवी आहे. हा दिवस लोकशाहीसाठी काळा दिवस आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.