जळगाव – मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथील ग्रामपंचायत सदस्य तेजराव भास्कर पाटील हे सतत सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीत ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना गैरहजर राहिल्याने त्यांना ग्रामपंचायत सदस्य पदावर राहण्यास जिल्हा परिषद अध्यक्षा नामदार रंजना पाटील यांनी अपात्र घोषित केले आहे.
कुऱ्हा काकोडा येथील ग्रामपंचायत सदस्य मंदाबाई दिनकर पाटील यांनी तेजराव भास्कर पाटील हे मासिक सभांना गैरहजर राहत असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने मुक्ताईनगर गट विकास अधिकारी यांच्याकडे प्राप्त झालेल्या चौकशी अहवालात तेजराव पाटील हे 22 जून 2020, 30 जुलै 2020, 14 ऑगस्ट 2020, 8 सप्टेंबर 2020, 19 ऑक्टोबर 2020, 27 नोव्हेंबर 2020, 28 डिसेंबर 2020, 29 जानेवारी 2021, 27 फेब्रुवारी 2021 व 26 मार्च 2021 या कालावधीत तेजराव पाटील हे गैरहजर असल्याचे आढळून आले. या प्रकरणाबाबत त्यांना लेखी व तोंडी बाजू मांडण्यास सांगण्यात आले. अर्जदाराने युक्तिवाद नोंदवले व लेखी म्हणणे सादर केले आहे. परंतु तेजराव भास्कर पाटील हे तीनही सुनावणीस अनुपस्थित होते. याप्रकरणी त्यांनी कागदपत्रांची मागणी केली असता त्यांना कागदपत्राची अवलोकन करण्यासाठी संधी देण्यात आली. त्यांनी पुढील सुनावणीची वेळ व दिनांक मिळण्यासाठी विनंती केली असता प्रस्तुत प्रकरणी संबंधित तीन संधी देण्यात आलेली असल्याने याची अंतिम सुनावणी जिल्हापरिषद अध्यक्षा ना. रंजना पाटील यांच्या दालनात दि. २७ ऑगस्ट रोजी घेण्यात आली. यात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 40 ( ब) मधील असलेल्या तरतुदीचा तसेच प्रकरणातील अभिलेख याची खात्री करून तेजराव भास्कर पाटील हे ग्रामपंचायत सदस्य कुऱ्हा काकोडा येथे लागोपाठच्या सहा महिन्यापेक्षा जास्त गैरहजर राहिले असल्याचे सिद्ध झाले आहे. याची त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 40(ब) या अधिनियमातील तरतुदीनुसार तेजराव पाटील ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास अपात्र करण्याच्या निर्णयाप्रत प्राधिकरण केला. जिल्हा परिषद अध्यक्षा ना. रंजना पाटील यांनी अधिनियमातील तरतुदीनुसार तेजराव भास्कर पाटील ग्रामपंचायत सदस्य कुऱ्हा काकोडा यांना सदरचे आदेश दि. २७ ऑगस्टपासून ग्रामपंचायत सदस्य पदावर राहण्यास अपात्र घोषित केले आहे. गैरअर्जदार तेजराव पाटील यांच्याकडून अँड.वसंत भोलाणकर यांनी बाजू मांडली.