मुक्ताईनगर : बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी पदाधिकार्यांमध्ये कलगीतुरा झाल्यानंतर जिल्ह्यात वातावरण तापले होते तर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी शांत होत नाही तोच आता मुक्ताईनगरात आखाडा पेटला आहे. शिवसेना-राष्ट्रवादी पदाधिकार्यांविरोधात गुन्हे दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दोन्ही पक्षातर्फे या प्रकरणी महिला तक्रारदारामार्फत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पोलिसांनी दोन संशयीतांना अटक केली आहे.
महिलेचा विनयभंग : शिवसेना पदाधिकार्यांविरोधात गुन्हा
पहिली तक्रार एका महिलेने दिली असून त्यानुसार शुक्रवार, 24 डिसेंबर रोजी रात्री साडेदहा अकरा वाजेच्या सुमारास मराठा मंगल कार्यालयाच्या पटांगणाजवळील त्यांच्या घरासमोर संशयीत ईश्वर हटकर (रा.खामखेडा) व सुनील पाटील (रा.मुक्ताईनगर) व त्यांच्यासोबत असलेल्या इतर 20 अनोळखी यांनी येत आरडा-ओरड केली तसेच धमकावलेे व विनयभंग करण्यात आला तसेच लोकप्रतिनिधींना शिविगाळ करण्यात आली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून खामखेडा ग्रामपंचायत सदस्य ईश्वर हटकर, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील व इतर 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करण्यात आलेले संशयीत आरोपी हे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. ईश्वर हटकर व सुनील पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे.
राष्ट्रवादी पदाधिकार्यांविरोधातही गुन्हा
दुसर्या घटनेत शहरातील शिवरायनगर परीसरातील एका महिलेच्या घरी संशयीत आरोपी शिवराज पाटील, अजय जैन व इतर आठ जणांनी महिलेचा पती कुठे आहे? असल्याची विचारणा करीत महिलेच्या गळ्यातील मंगलपोत तोडून विनयभंग केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी सोशल मिडीया जिल्हाप्रमुख शिवराज पाटील, अजय जैन व इतर आठ जणांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुल खताळ, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, नाईक अविनाश पाटील करीत आहेत.
राजकीय दबावातून गुन्हा : अजय जैन
गुन्ह्याच्या कारवाईसंदर्भात अजय जैन म्हणाले की, मी काँग्रेसचा जिल्हा उपाध्यक्ष आहे. या गुन्ह्याशी आपला काडीमात्र संबंधच नाही मुळात ज्या वेळेत हा गुन्हा घडल्याचा आरोप करण्यात आला त्यावेळी मी माझ्याच घरात होतो हवे तर मोबाईल लोकेशन काढा, माझ्याकडे त्याबाबत सीसीटीव्ही पुरावेदेखील आहेत. यापूर्वीदेखील शिवसेना पदाधिकार्यांनी शिविगाळ केल्याने मी त्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. मुक्ताईनगरातील वातावरण बिहारसारखे करण्याचा प्रकार असल्याचे अजय जैन म्हणाले.