माझ्या पतीने 15 कोटींसाठी सतीश कौशिक यांची हत्या केली, महिलेच्या दाव्याने खळबळ

0
10

मुंबई – बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माता सतीश कौशिक यांचे 9 मार्च रोजी दिल्लीत निधन झाले. त्यांच्या मृत्युचे गूढ कायम असतानाच एका महिलेने खळबळजनक दावा केल्याने तपासाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. माझ्या पतीने 15 कोटींसाठी सतीश कौशिक यांची हत्या केल्याचा दावा एका व्यावसायिकाच्या पत्नीने केला आहे. महिलेने या प्रकरणी दिल्ली पोलिसांकडे तक्रारही दाखल केली आहे.

दुबईत गुंतवणूक करण्यासाठी माझ्या पतीने सतीश कौशिक यांच्याकडून 15 कोटी रुपये पैसे घेतले होते. सतीश कौशिक हे पैसे परत मागत होते, मात्र पतीला ते पैसे परत करायचे नव्हते. त्यामुळे माझ्या पतीने औषधे देऊन त्यांची हत्या केली, असा दावा महिलेने तिच्या तक्रारीत केला आहे. विशेष म्हणजे सतीश कौशिक हे निधनाआधी दिल्लीतील ज्या फार्महाऊसवर पार्टीला गेले होते, तिथे दिल्ली पोलिसांना काही संशयास्पद औषधे सापडली होती.

सदर महिलेने दिल्ली पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांनी तिच्याशी संपर्क साधला असता तिने ही हत्या पूर्वनियोजित असल्याचे म्हटले. 13 मार्च 2019 ला माझे त्यांच्याशी (व्यावसायिकाशी) लग्न झाले. त्यानेच माझी ओळख सतीश कौशिक यांच्याशी करून दिली होती. त्यानंतर सतीश आम्हाला अनेकदा दिल्ली आणि दुबईत भेटले होते, असा दावा महिलेने केला आहे.

23 ऑगस्ट 2022 रोजी सतीश कौशिक हे आमच्या दुबईतील घरी आले होते. त्यांनी पतीकडे 15 कोटी रुपयांची मागणी केली. वेळी मी ड्रॉईंग रुममध्ये उपस्थित होते. माझे पती आणि सतीश कौशिक यांचा वाद झाला, असेही महिलेने सांuगितले. मला पैशांची गरज आहे. मी तुला 3 वर्षांपूर्वी गुंतवणुकीसाठी 15 कोटी रुपये दिले होते, असे सतीश कौशिक माझ्या पतीला म्हणाले. या पैशातून कोणतीही गुंतवणूक करण्यात आली नाही आणि ते पैसे परतही दिले नाहीत. माझी निव्वळ फसवणूक करण्यात आली, असे सतीश कौशिक त्यावेळी म्हणाले होते,’ असेही महिलेने सांगितले.

दरम्यान, दुबईतील एका पार्टीत काढण्यात आलेला सतीश कौशिक आणि व्यावसायिकाचा फोटोदेखील महिलेने शेअर केला. त्या पार्टीला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा मुलगादेखील उपस्थित होता, असा आरोप महिलेने केला. आपला पती ड्रग्जचा व्यवसाय करत असल्याचेही महिलेने सांगितले.

माझ्या पतीने सतीश कौशिक यांनुा लवकरच पैसे परत करीन असे वचन दिले होते. याबाबत मी विचारले असता त्यांनी सतीश यांचे पैसे कोविड महामारीच्या काळात गमावल्याचे सांगितले. सतीशपासून मला स्वत:ची सुटका करून घ्यायची असल्याचेही पतीने म्हटल्याचे महिलेने सांगितले.

24 ऑगस्ट 2022 रोजी माझे पती आणि सतीश कौशिक यांचा पैशांवरून वादही झाला होता. पेमेंट ऍडव्हान्समध्ये करण्यात आल्याने त्याचा कोणताही पुरावा नाही. पण मी तुमचे पैसे परत करेन. त्यासाठी मला वेळ द्या, असे पतीने सतीश यांना म्हटल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले. तसेच ती पुढे म्हणाली की, आता मी सतीश कौशिक यांच्या मृत्युची बातमी वाचली. मला दाट संशय आहे की माझ्या पतीने त्याच्या सहकाऱ्यांसोबत सतीश यांच्या हत्येचा कट रचला आणि औषधं देऊन त्यांची हत्या करण्यात आली.

Spread the love