प्रतिनिधी जितेंद्र काटे
भुसावळ – पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी जी यांनी आज नवीन ३ वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना बंगळुर (कर्नाटक) येथे आयोजित कार्यक्रमातून हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. सदर कार्यक्रमाचे भुसावळ स्टेशन येथे आयोजन करण्यात आले असता केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह मंत्री श्री.गिरीषजी महाजन, मंत्री श्री.शिवेंद्रराजे भोसले, मंत्री श्री.संजयजी सावकारे यांनी उपस्थित राहून नागपूर (अंजनी)-पुणे ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस चे स्वागत केले, तसेच हिरवा झेंडा दाखवून गाडीस पुणे कडे रवाना केले.
मुंबई – नागपूर किंवा पुणे – नागपूर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यावर अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील प्रवाशांची मागणी होती, त्यानुसार केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी रेल्वे मंत्री यांची भेट घेऊन तसेच पत्र व्यवहार करून अनेकवेळा मागणी केली होती. आता सदर मागणीस यश आले असून, आज पासून पुणे – नागपूर (अजनी) मार्गावर आठवड्यातून ६ दिवस वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेस मुळे अवघ्या १२ तासांत *पुणे ते नागपूर चा प्रवास होणार आहे. ही गाडी या मार्गावरील सर्वांत वेगवान रेल्वे ठरणार आहे. सध्या पुणे-नागपूर मार्गावर हावडा-दुरांतो एक्स्प्रेस ही सर्वांत जलद रेल्वे आहे. पुणे ते नागपूर अंतर कापण्यासाठी दुरांतोला १२ तास ५५ मिनीटे वेळ लागतो. ‘वंदे भारत’ ला त्याहून एक तास कमी वेळ लागणार आहे.
याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह मंत्री श्री.गिरीषजी महाजन, मंत्री श्री.शिवेंद्रराजे भोसले, मंत्री श्री.संजयजी सावकारे, जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, मंडळ रेल्वे व्यवस्थापक श्री. पुनित अग्रवाल तसेच महायुती पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.