नाशिकच्या द्वारका पुलावर रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील मृत आणि जखमींमध्ये प्रामुख्याने किशोरवयीन मुलांचा समावेश आहे.
द्वारका पुलावर रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघातघडला. या अपघातामध्ये एका पिकअप टेम्पोने (छोटा हत्ती) लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकला धडकली. या ट्रकमधील लोखंडी सळ्या अंगातून आरपार गेल्याने चार मुलांचा जागीच मृत्यू झाला.
प्राथमिक माहितीनुसार, लोखंडी सळ्यांनी भरलेला ट्रक धुळ्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. त्यावेळी द्वारका उड्डाणपुलावर एक पिकअप टेम्पोने मागून ट्रकला जोरात धडकला. ही धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिकअप ट्रकच्या मागच्या बाजूला पोरसवदा मुलांचा एक ग्रूप होता. अपघातानंतर लोखंडी ट्रकमधील सळया यापैकी काहीजणांच्या अंगात शिरल्या. या सगळ्यांच्या शरीरातून बराच रक्तस्राव झाला. त्यामुळे रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच चार जणांचा मृत्यू झाला. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये अतुल मंडलिक, संतोष मंडलिक, दर्शन घरते, यश घरते, चेतन पवार यांचा समावेश आहे. तर राहुल राठोडे (वय 20), लोकेश निकम (वय 18), अरमान खान (वय 15), ओम काळे, अक्षय गुंजाळ, राहुल साबळे हे सर्वजण गंभीररित्या जखमी असल्याची माहिती आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेबद्दल माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणी पोलिसांकडून बराचवेळ वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरु होते.
शेवटचं स्टेटस व्हायरल
नाशिकमधील या दुर्घटनेत मृत्यू झालेली मुलं ही सिडकोच्या सह्याद्रीनगर परिसरातील रहिवाशी होती. हे सर्वजण निफाड तालुक्यातील धारणगाव येथे देवाचे कारण या कार्यक्रमासाठी गेले होते. हा कार्यक्रम आटोपून महिलांचा टेम्पो आणि पुरुषांचा टेम्पो पुन्हा नाशिकच्या दिशेने परतत होते. महिलांचा टेम्पो सुरक्षितपणे सह्याद्रीनगर येथे पोहोचला. मात्र, पुरुषांच्या ट्रकचा द्वारका पुलावर अपघात झाला.
या अपघाताच्या काहीवेळापूर्वीच पिकअप टेम्पोमधील मुलांनी सोशल मीडियावर एक स्टेटस शेअर केले होते. यामध्ये टेम्पोच्या मागच्या बाजूला ही सर्व मुले गाण्यावर नाचत होती. काही मुले टेम्पोच्या वरच्या भागावर चढून बसली होती. सर्वजण आनंदात होते. मात्र, पुढील काही क्षणांमध्येच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने सह्याद्रीनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.