राष्ट्रवादीची रोपटी खुरटी का राहिली?

0
13

जळगाव – :जिल्ह्यात शरद पवार साहेब, सुप्रिया ताई सुळे,जयंत पाटील यांच्या वाऱ्या झाल्या.पण यातून अजूनही कोणी सक्षम ,कार्यक्षम, पब्लिक फेस उमेदवार हाती लागला नाही.कारण जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी ने कोणाला सोबत घेतले नाही.कोणाला मोठे होऊ दिले नाही.जुनी ,थकलेली,पानगळ झालेले स्वयंघोषित नेते आणि खुरटलेली कार्यकर्ते जिल्ह्यातील मतदारांना आकर्षित करू शकत नाहीत.उद्याचे अपयश आजच नजरेसमोर आहे.डोळे झाकलेत म्हणून ते दिसत नाही, इतकेच काय ते समाधान.

रावेर लोकसभा निवडणुकीत सुद्धा अचानक भाजप कडूनच उसनवारीने उमेदवार घेतला‌.हा संघटनात्मक पराभव होता.संसदीय पराभव नंतर झाला.दहा दिवसात नवखा उमेदवार आणि मतदारांची ओळख सुद्धा झाली नाही.तर विश्वास तरी कसा टाकावा?या संभ्रमात मतदारांनी नाईलाजाने भाजप उमेदवाराला मतदान केले.भाषणबाजी ,पोस्टर बाजी खूप झाली.ती विश्वास ठेवण्यास पुरेशी ठरली नाही.यातून पवार साहेब आणि जयंत पाटील धडा घेत नसतील तर विधानसभेत जिल्ह्यातून एकही आमदार निवडून येणार नाही.
राष्ट्रवादी पक्ष १९९९ पासून जरी कांग्रेस मधून वेगळा झाला असला तरीही स्वतंत्र अस्तित्व प्रस्थापित करता आले नाही.कांग्रेस विरोधात बंड करुन, कांग्रेस विरोधात निवडणूक लढवूनही पुढील पंधरा वर्षे कांग्रेस सोबत सरकार बनवून कसेतरी निभावले.या पंदरा वर्षात कार्यकर्ते कमी आणि संपत्ती जास्त जमवली.परिणामी मोदींनी डोळे वटारताच ३/४ आमदार राष्ट्रवादी सोडून भाजपच्या आश्रयाला गेले.या कृत्याबद्दल मोदी आणि फडणवीस यांना कितीही कोसले तरीही ते पूरेसे नाही.आपलीच माणसे,आपलेच आमदार भयभीत झाले होते.म्हणून नाही नाही म्हणत भाजप ने गिळून घेतले.आमचे घर फोडले याबद्दल जितका शेजारी जबाबदार आहे त्यापेक्षा जास्त घरमालक जबाबदार आहेच.हेच आम्ही पवार साहेब आणि जयंत पाटील यांच्या लक्षात आणून देत आहोत.

आजच्या स्थितीत जळगाव जिल्ह्यातील असा एकही नेता ,उपनेता,कार्यकर्ता नाही कि तो जिल्ह्यातील राष्ट्रवादी चे नेतृत्व करू शकतो.सर्वच गाडीला मागे बांधलेले म्हशीसारखे ओढले जात आहेत.जिल्ह्यात महाआघाडी चे नेतृत्व भाजप सोडून शिवसेनेत आलेले उन्मेश पाटील करीत आहेत.आमची रोपटी खुरटी का राहिली?

अमळनेरचे एकमेव आमदार राष्ट्रवादीचे होते.ते सुद्धा सोडून पळून गेले.इतर मतदारसंघात तर स्मशान शांतता आहे.भाजपला दोष देऊन,बोटे मोडून,श्राप देऊन राष्ट्रवादीला मतदान मिळणार नाही.मतदारांना काम दिसले पाहिजे.मतदारांचे सरकार दरबारी अडलेले काम झाले पाहिजे.असा एकही नेता,उपनेता,कार्यकर्ता आमच्या जळगाव जिल्ह्यात नाही.आमची रोपटी खुरटी का राहिली?

जळगाव ग्रामीण मधे गुलाबराव पाटील विरोधात जरी गुलाबराव देवकर यांचे नाव जाहीर केले असले तरीही मागील दहा वर्षात गुलाबराव देवकर यांनी असे कोणतेही नेतृत्व केले नाही जे गुलाबराव पाटील यांना कमी लेखू शकते. डावलू शकते.राहिला प्रश्न भ्रष्टाचाराचा.त्यातही एक जात्यात आहे,दुसरा सुपात आहे.तो कलंक दहा वर्षात देवकरांना मिटवता आला नाही,पुसता आला नाही,कमी करता आला नाही,झाकता आला नाही.तसा प्रयत्न केलाच नाही.ती हिंमत केलीच नाही.मातीचे पाय असलेले सैन्य लढू शकत नाही.
जळगाव शहर मतदारसंघातून आजतरी राष्ट्रवादीचा कोणी खमक्या नेता नाही.ज्याला मतदार आमदार म्हणून पाहातील.पुन्हा शिवसेना किंवा भाजप मधूनच उसनवार उमेदवार घेण्याची नामुष्की राष्ट्रवादी वर आली आहे.
जामनेर मतदारसंघात अजूनही राष्ट्रवादी चा कोणी उमेदवार मतदारांच्या नजरेत नाही.येथेही भाजपच्या सावलीत वाढलेले,भाजप कडूनच उसनवार उमेदवार घ्यावा लागणार आहे.असा माणूस गिरीश महाजन यांच्या समोर सरळ उभा राहू शकत नाही.एकतर झुकलेला असेल किंवा थरथर करीत असेल.आमची रोपटी खुरटी का राहिली?

पाचोरा मधे शिवसेना आमनेसामने आहे.मधेच भाजप मुसंडी मारू शकते. चाळीसगाव मधे अपयश ललाटी आहे.म्हणून भाजप कडूनच शिवसेनेत आलेले उन्मेष पाटील यांनाच शिवसेना कडून उमेदवारी द्यावी लागेल.तरच विजय हाती लागेल.एरंडोल मधे तर शिवसेना विरूद्ध शिवसेना दंड थोपटत आहे.चोपडा मतदारसंघात डॉ चंद्रकांत बारेला सज्जन माणूस म्हणून मतदार पसंत करू शकतात.रावेर मधे राष्ट्रवादी नाहीच.मुक्ताईनगर मधे भाजप नेत्यांना राष्ट्रवादी चे लेबल लावून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.जिंकून आले किंवा हारले तरीही राष्ट्रवादीच्या हाती दुपाटणे लागणार आहे.भुसावळ मधे निल बटा सन्नाटा आहे.आमची रोपटी खुरटी का राहिली?

जिल्ह्यात सभा,सम्मेलने,मेळावे झाले तरीही ते राजकीय कमी आणि सांस्कृतिक जास्त झाले. मतदारांना आकृष्ट करणारा एकही कार्यक्रम झाला नाही.
मला म्हणतात,काका तुम्ही कोणालाही चांगले म्हणत नाही.कसे म्हणणार?सत्य सांगताना काही लपवून ठेवणे जमत नाही म्हणून हा दोष मला लागतो.मी स्विकारतो.मान्य करतो.आजार शोधला तर उपचार करता येतो.त्यालाच तर डॉक्टर म्हणतात.

जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे वास्तव मांडण्यासाठी आम्ही जमीनीवरचे लोक पवार साहेबांना भेटू इच्छित आहोत.पण तसा प्रयत्न किंवा सहकार्य कोणीही राजकीय माणसाने केले नाही.कदाचित पवार साहेबांना जिल्ह्यातील वास्तव कळले तर आपली खुर्ची शाबूत राहाणार नाही,अशी भीती जिल्ह्यातील नेत्यांना वाटत असावी.भेट झाली नाही म्हणून काय झाले?कोंबडा झाकला तरी सुर्य उगवणे थांबते का?

शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

Spread the love