हनुमान चालिसा पठणावरून नवे कायदेशीर संकट ओढवून घेतलेल्या खासदार नवनीत राणा यांच्यामागील शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे नाहीत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कथित बोगस कागदपत्रांच्या आधारे मिळवलेल्या जात प्रमाणपत्राचा फैसला सर्वोच्च न्यायालय जुलैमध्ये करणार आहे. त्यावर नवनीत यांची खासदारकी राहणार की जाणार, याचे भवितव्य अवलंबून आहे.
नवनीत राणा-कौर यांनी 2019 मध्ये अनुसूचित जातीच्या प्रवर्गातून लोकसभा निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांनी फेरफार केलेल्या कागदपत्रांच्या आधारे ‘मोची’ समाजाचे जात प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांची खासदारकी संकटात सापडली आहे. याआधी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचे जात प्रमाणपत्र रद्दबातल ठरवून मोठा झटका दिला आहे. त्याचवेळी त्यांना दोन लाखांचा दंडही ठोठावला होता. त्यामुळे गोत्यात आलेल्या नवनीत यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली होती. त्यानंतर गुरुवारी हे प्रकरण न्यायमूर्ती विनीत सारण आणि न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी यांच्या खंडपीठापुढे सुनावणीला आले. यावेळी नवनीत यांच्या वतीने वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. त्यांनी सुनावणीसाठी आणखी वेळ मागितला. त्यानंतर न्यायालयाने सुनावणी जुलैमध्ये घेण्याचे निश्चित केले. न्यायमूर्ती सारण हे 10 मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे नवीन खंडपीठापुढे याची सुनावणी होईल.
10 महिने ‘तारीख पे तारीख’
नवनीत राणा यांचे अपील दहा महिने खोळंबले आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापुढे आठ वेळा सुनावणीसाठी आले, मात्र प्रत्येकवेळी सुनावणी पुढे ढकलली गेली.
12 दिवसांनंतर तुरुंगाबाहेर; ‘लीलावती’त दाखल
हनुमान चालिसा पठण प्रकरणात अटक झालेल्या नवनीत राणा यांची 12 दिवसांनंतर गुरुवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास भायखळा येथील महिलांच्या तुरुंगातून सुटका झाली. तुरुंगाबाहेर येताच सर्वात आधी त्यांनी प्रसारमाध्यमांपुढे हात जोडले. त्यांना मणक्याचा आणि रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने तुरुंगातून थेट वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. यादरम्यान अवघ्या 10 मिनिटांत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लीलावती रुग्णालय गाठले आणि नवनीत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. नवनीत व त्यांचे पती रवी राणा यांना बुधवारी सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. त्यानंतर दुसऱया दिवशी हे दांपत्य तुरुंगातून बाहेर आले.