मुंबई : हनुमान चालीसा प्रकरणी गेल्या आठवडाभरापासून तुरुंगात असलेल्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांच्या जामीन याचिकेवर न्यायालय आज सायंकाळी 5 वाजता निकाल देणार होते.
पण, आता याप्रकरणी न्यायालय 4 मे रोजी निकाल देणार आहे. आज आपला नेता तुरुंगातून बाहेर येईल, अशी राणा समर्थकांना अपेक्षा होती. त्यामुळे समर्थकही राणा दाम्पत्याच्या घरी जमू लागले. वेळेची कमतरता आणि इतर खटल्यांच्या सुनावणीमुळे आज राणा दाम्पत्याच्या जामिनावर न्यायालय निकाल देऊ शकले नाही. आता बुधवारी निर्णय अपेक्षित आहे. राणा दाम्पत्याच्या जामीन प्रकरणात बचाव पक्ष आणि सरकारी वकिलांच्या युक्तिवादाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राणा दाम्पत्याला जामीन मिळणार की त्यांना आणखी काही दिवस तुरुंगात काढावे लागणार, याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.
राणाच्या वकिलाचे तुरुंग अधीक्षकांना पत्र
दरम्यान, नवनीत राणा यांच्या वकिलाने भायखळा कारागृह अधीक्षकांना पत्रही लिहिले आहे. पत्रात नमूद करण्यात आले आहे की, नवनीत राणा यांना स्पॉन्डिलायटिसचा त्रास होत असून तुरुंगात सतत जमिनीवर बसून राहिल्याने त्यांचा अधिकच त्रास होत आहे. त्यामुळे राणांना 27 एप्रिल रोजी मुंबईतील जेजे रुग्णालयात नेण्यात आले. जेजे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी खास लिहून ठेवले होते की, त्यांचे सिटी स्कॅन करणे खूप गरजेचे आहे. जेणेकरून स्पॉन्डिलायटिसची समस्या किती गंभीर आहे, हे कळू शकेल. मात्र, डॉक्टरांच्या या सूचनेवरही संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. अशा परिस्थितीत रुग्णाला कोणते औषध द्यावे आणि कोणते देऊ नये, हे ठरवणे फार कठीण आहे. यासंदर्भात त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला विनंतीही केली होती, मात्र त्यांची विनंती मान्य करण्यात आली नाही, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. राणांच्या वकिलाचे म्हणणे आहे की, जर त्यांच्या अशिलाचा त्रास आणखी वाढला किंवा त्यांना आणखी काही त्रास झाला, तर त्याला जेल प्रशासन जबाबदार असेल.