धरणगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कथित १० कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने झुरखेडा येथील लोकनियुक्त सरपंच एस. जी. पाटील यांनी सरकारविरोधात आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच संबंधित विभागाला यापूर्वी तक्रार देण्यात आली होती. मात्र त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.
तक्रारीनुसार, श्री गुलाबराव बाबूराव देवकर यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना स्वतःच्या संबंधित संस्थेला लाभ मिळवून देण्यासाठी सुमारे १० कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे. बँकिंग विनियमन अधिनियमाचे उल्लंघन करून ठरावामध्ये फेरफार, कागदपत्रांतील त्रुटी, तसेच आवश्यक परवानग्यांचा अभाव अशा अनेक गंभीर अनियमितता या प्रकरणात झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
तसेच, बँकेच्या लेखापरीक्षण अहवालातही या व्यवहारांबाबत हरकती नोंदविण्यात आल्या असूनही, संबंधित रक्कम वसूल करण्याबाबत अद्याप कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नसल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या सर्व प्रकरणाकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत सरपंच एस. जी. पाटील यांनी दि. १४ एप्रिल २०२६ पासून झुरखेडा शिवारातील त्यांच्या गट क्रमांक ७६/३ या शेतात आमरण उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे.
“आता प्राण गेले तरी चालतील, पण माघार नाही,” असा ठाम इशाराही त्यांनी दिला आहे.
पाटील यांनी संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करणे, सहकार क्षेत्रातील पदांसाठी अपात्र ठरविणे आणि संपूर्ण रक्कम व्याजासह वसूल करणे या प्रमुख मागण्या शासनाकडे केल्या आहेत.
या घोषणेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






