जळगाव – येथील तहसील कार्यालयात सामान्य जनतेच्या विविध समस्या प्रलंबित आहेत़ सामान्य नागरिकांचे वेळेत काम होत नाही़ मात्र कर्मचारी आणि अधिकारी मस्त असून सामान्य माणूस हवालदिल झाला आहे. या कार्यालयामध्ये तर दलाल सक्रिय झाल्याने सामान्य जनतेची लूट सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.सामान्य नागरिकाला कार्यालयात दररोज येरझारा माराव्या लागतात. सामान्य नागरिक आपले रोजीरोटीचे काम सोडून ‘साहेब, माझे काम करून द्या’, अशी विनवणी करीत असतो़ परंतु साहेब, लिपीक, कर्मचाऱ्यांना त्या सामान्य नागरिकांचे काहीच घेणेदेणे नसते. जनतेच्या समस्यांमागील साधे कारणही जाणून घेण्याचा प्रयत्न कर्मचारी करीत नसल्याचे दिसून येते.
सध्या शेतकरी पूर्णपणे संकटात सापडले आहे़ त्यांची मुले महाविद्यालयीन, प्राथमिक शिक्षण घेत आहे़ शेतकरी आपल्या पाल्यांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी कागदपत्रे मिळण्याकरिता तहसील कार्यालयात चकरा मारतात़ मात्र ते जेव्हा कार्यालयात पोहोचतात, तेव्हापासूनच दलाल सक्रिय होऊन त्यांना गाठतात़ त्यांना कागदपत्रे त्वरित काढून देऊ, अशी बतावणी करून त्यांची आर्थिक लूट करतात.
या लुटीत काही लिपीकही सहभागी दिसतात. सेतू केंद्रात काम करणारे काही कर्मचारीही त्यात सहभागी होतात. मात्र सर्वच अधिकारी, कर्मचारी सारखे नसतात. काही अधिकारी, कर्मचारी कर्तव्यदक्षपणे कामही करतात. परंतु कामचुकार आणि लोभी लिपीकांमुळे प्रामाणिक अधिकारी, कर्मचारी बदनाम होतात.
काही अधिकारी, कर्मचारी नेहमी जनतेची कामे काम करण्यास तत्पर असतात. मात्र संबंधित लिपीक, सेतू कर्मचारी यांच्यामुळे अधिकाऱ्यांना नामुष्कीला सामोरे जावे लागते. काही ठिकाणी तर सर्व सामान्य नागरिकांचे कामच होत नाही़
तथापि, लोभी कर्मचारीही अत्यंत हुशार असतात. जे नागरिक वरिष्ठांपर्यंत तक्रारी करू शकतात, त्यांची कामे ते जलदगतीने करून देतात़ त्यामुळे आपल्याविरूध्द कुणी तक्रार करू नये, याची ते दक्षता घेताना दिसतात. तरी सर्व प्रकाराची वरिष्ठांनी लवकरात लवकर दखल घ्यावी सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही करण्यात येत आहे.










