नागपूर – जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी शिक्षा सुनावलेले कॉंग्रेस नेते सुनील केदार यांच्याबद्दल महत्वाची अपडेट समोर आली आहे. माजी मंत्री सुनील केदार यांना उच्च न्यायालयाकडून जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे.
एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात कॉंग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना जिल्हा न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणी सुनील केदार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी आज (मंगळवार, ७ जानेवारी) सुनावणी पार पडली.
सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आणि शिक्षेला स्थगिती देण्याच्या अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी झाली. ज्यामध्ये एक लाखाच्या जातमुचलक्यावर सुनील केदार यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती उर्मिला जोशी यांच्या एकल खंडपीठाने हा निर्णय दिला.
दरम्यान, सुनील केदार यांच्या जमीन अर्जावर दोन्ही पक्षाकडून जोरदार युक्तिवाद झाला. सुनील केदार यांच्याकडून प्रसिद्ध वकील सुनील मनोहर यांनी युक्तिवाद केला तर राज्य सरकारकडून वकील राजा ठाकरे यांनी बाजू मांडली. राज्य सरकारने या जामीन अर्जाला विरोध केला आहे.