जळगाव – राज्यातील गावगाडा चालवणाऱ्या प्रमुख घटकांना न्याय देण्याची माफक अपेक्षा घेऊन राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करीत आलो. गेल्या तीन दिवस राज्यातील 28 हजार ग्रामपंचायती बंद ठेवत लक्ष वेधल्यावर सुद्धा शासनाचा प्रतिसाद नसल्याने अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या माध्यमातून ग्रामसेवक युनियन,संगणक परिचालक,ग्रामपंचायत कर्मचारी संघटना आणि ग्रामरोजगार सेवक यांनी आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी सरपंच संघटनेचे राज्य सरचिटणीस विवेक ठाकरे यांच्या नेतृत्वात सर्वच संघटनाच्या जिल्हाध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांनी काळे कपडे घालून काळे निवेदन देण्यात आले.
अन्यथा मंत्रालयावर अपेक्षा मोर्चा
सलग तीन दिवस ग्रामपंचायती बंद ठेवल्यावर गावागाडा चालवाणऱ्या घटकांची एकजूट शासनाला दाखवून दिली असल्याने आता तातडीने मागण्या मान्य कराव्यात अन्यथा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातील राज्यातील प्रत्येक गावातून सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक,ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक व ग्रामरोजगार सेवक सर्वांचा लाखोंचा संयुक्त असा गावखेड्यांचा अपेक्षा मोर्चा मंत्रालयावर काढण्यात येईल, असा ईशारा काळ्या निवेदनातून देण्यात आला.
या आहेत प्रमुख मागण्या
सरपंचांच्या मानधनात वाढ करावी, सरसकट शासनाने मानधन व भत्त्याची रक्कम द्यावी,ग्रामपंचात सदस्यांना विधानपरिषदेत मतदानाचा अधिकार मिळावा, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी याऐवजी पंचायत विकास अधिकारी असे नवीन पद निर्माण करावे,संगणक परिचलकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा मिळावा, ग्रामरोजगार सेवकांना अर्धवेळ ऐवजी पूर्णवेळ कर्मचारी म्हणून नियुक्ती मिळावी,ग्रामपंचात कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणी लागू व्हावी,जिल्हा परिषद कर्मचारी भरतीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वीस टक्के मर्यादा वाढवून मिळावी याशिवाय वेळोवेळी केलेल्या मागण्यांची दखल व्हावी याबाबतचे ईशारा निवेदन यावेळी रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांना देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
अखिल भारतीय सरपंच परिषद प्रदेश सरचिटणीस विवेक ठाकरे , जिल्हाध्यक्ष वासुदेव नरवाडे ,जिल्हा उपाध्यक्ष सचिन महाले, राज्य संघटक अनिल पाटील (पारोळा),महाराष्ट्र ग्रामसेवक युनियन कायदेशीर सल्लागार रमेश पवार, संगणक परिचालक संघ जिल्हाध्यक्ष रिंकू चौधरी, ग्रामपंचायत कर्मचारी संघ ६८२ जिल्हाध्यक्ष विजय रल, ग्रामरोजगार संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे, अधिकार पाटील,ग्रामसेवक गिरीष चव्हाण एरंडोल, उल्हास जाधव, कैलास राणे एरंडोल, विजय पाटील चाळीसगाव, विवरे सरपंच युनुस तडवी, दिलीप पंडीत, महेंद तायडे, विकास पाटील, समाधान खैरे , समाधान पाटील यासह सरपंच, ग्रामसेवक, संगणक परिचालक, ग्रामरोजगार सेवक, ग्राम पंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












