‘या’ दिवशी राज्यात स्थापन होणार महायुतीचं सरकार; कोण होणार मुख्यमंत्री?

0
27

मुंबई -: महाराष्ट्राच्या विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतमोजणी सुरु आहे. सकाळी २ वाजेपर्यंतच्या मतमोजणीनुसार महायुतीला जोरदार यश मिळताना पाहायला मिळत आहे.

भाजपला १२७, शिवसेनाला ५५, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ३५ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर महाविकास आघाडीची जोरदार पिछेहाट होताना दिसत आहे. त्यामुळे महायुतीचं सरकार येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत घडामोडींना वेग आला आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी भाजप नेते जमायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, येत्या २५ नोव्हेंबरला राज्यात सरकार स्थापन केलं जाणार असल्याची शक्यता आहे.

येत्या २६ नोव्हेंबरला सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे त्याआधीच सरकार स्थापन करणे आवश्यक आहे. अन्यथा राज्यात राष्ट्रपती लागवट लागू होण्याची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील : प्रविण दरेकर

भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी यासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असं वक्तव्य दरेकर यांनी केलं. देवेंद्र फडणवीस यांनी जे धर्मयुद्ध पुकारलं होतं त्यासाठी हम सब एक हैचा नारा जनतेनं मान्य केला. केंद्रात भाजपचं सरकार, महाराष्ट्रात भाजपचं सरकार आल्यास राज्याचा विकास होईल, यामुळं अधिक मतदान झालं, असं प्रविण दरेकर म्हणाले. आम्हाला विजयाची खात्री होती. महाराष्ट्राची जनता इतका आशीर्वाद देईल, असं वाटलं नव्हतं. लाडक्या बहिणींना सलाम करतो, त्यांच्यापुढं नतमस्तक होतो, असं दरेकर म्हणाले.

विधानसभेच्या २८८ मतदारसंघाचं चित्र होणार स्पष्ट 

अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी सुरू झाली आहे. राज्यात सत्ता बदल होणार की पुन्हा महायुतीचं सरकार येणार? हे आज स्पष्ट होईल. २८८ विधानसभा मतदारसंघासाठी २० नोव्हेंबरला मतदान पार पडलं. यावेळी २८८ मतदारसंघात ४ हजार १४० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यावेळी राज्यात सर्वाधिक ६६ टक्के मतदान झालं आहे. त्यामुळे वाढलेलं मतदान कुणाच्या बाजूने असणार हे पाहण्याचं ठरणार आहे.

Spread the love