पारोळा – येथे ब्रह्मोत्सवाच्या पहिल्या वहनाच्या मिरवणुकीत वाहन ओढण्यावरून लहान मुलांच्या झालेल्या भांडणाचे पर्यवसान दगडफेकीत झाले. बंदोबस्तासाठी असलेले शहरातील तीन, तर बाहेरगावच्या महिला पोलिस कर्मचारी जखमी झाल्या.
ही घटना गुरुवारी (ता. ३) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. रात्री साडेबारापर्यंत पोलिसांनी हा वाद मिटविला. बुधवारी (ता. ३) रात्री साडेआठच्या सुमारास श्री बालाजी महाराजांचे पहिले वहन भवानीगड येथे आले असता, वाहन ओढण्यावरून अचानक एकमेकांवर दगडफेक करण्यात आली.
ही माहिती कळताच पोलिसांच्या गोपनीय शाखेचे महेश पाटील व किशोर भोई घटनास्थळी आले. घटना हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिस कार्यालयाशी संपर्क साधून मदत मागितली. दोन समाजांतील संघर्ष थांबविण्यासाठी पोलिसांनी विनंती केली. मात्र, दोन्हींनी काही एक न ऐकता दगडफेक सुरूच ठेवली. यात पोलिस कर्मचारी महेश पाटील यांच्या डाव्या कानाच्यावर डोक्यावर काठीसदृश वस्तू मारल्याने त्यांना जागेवरच भोवळ आली. पोलिस उपनिरीक्षक श्रीमती तिवारी यांनाही पायावर दगडाचा जबर मार लागल्याने पाय फ्रॅक्चर झाला.
त्यांच्यावर जळगावला, तर महेश पाटील यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दगडफेकीत गृहरक्षक दलाचे भटू पाटील व धोंडू लोंढे हेही जखमी झाले. दरम्यान, पोलिसांनी किशोर भोई यांच्या फिर्यादीवरून २४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आणखी काही संशयितांची ओळखपरेड सुरू असल्याने संशयितांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या १२ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.