शिरपुर -: पशुपक्ष्यासाठी लागणारी औषध विक्री केंद्राची परवानगी मिळावी; यासाठी अर्ज करण्यात आला होता. दुकानासाठीचा परवाना देण्याच्या मोबदल्यात आठ हजार रुपयांची लाच मागणारा औषध निरीक्षक व त्याचा खासगी व्यक्तीला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने सापळा रचून ताब्यात घेतले.
सदरची कारवाई धुळे येथील पारोळा चौफुलीवर करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक किशोर देशमुख आणि शिरपूरमधील मेडिकल दुकानदार तुषार जैन अशी संशयितांची नावे आहेत. सदर प्रकरणातील तक्रारदाराला शिरपुर शहरात पशु पक्ष्यांसाठी औषध विक्री केंद्र सुरू करायचे होते. त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचा परवाना आवश्यक होता. हा परवाना मिळविण्यासाठी तक्रारदाराने अन्न व औषधी प्रशासनाकडे अर्ज केला होता.
एसीबीकडे केली तक्रार
दरम्यान परवाना हवा असेल तर आठ हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी औषध निरीक्षक किशोर देशमुख याने पंटर तुषार जैन याच्या माध्यमातून केली. मात्र परवाना मिळविण्यासाठी आठ हजाराची लाच देणे तक्रारदाराला देणे मान्य नव्हते. यावरून ४ मार्चला तक्रारदाराने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दिली. यानंतर एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली असता देशमुख याने स्वतःसाठी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
लाच स्वीकारताच एसीबीने घेतले ताब्यात
यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचत धुळे येथे आलेला तुषार जैन याने पारोळा चौफुलीवर येऊन तक्रारदाराकडून आठ हजार रुपये स्वीकारले. त्याच वेळी लाचलुचपत प्रतिबंधक शाखेच्या पथकाने झडप टाकून त्याला ताब्यात घेतले. आझादनगर पोलिस ठाण्यात देशमुख व जैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सचिन साळुंखे, निरीक्षक रूपाली खांडवी, पंकज शिंदे यांच्या पथकाने केली.