पवार इज द पावर..! इंग्रजीचा वापर करत निलेश लंकेचा सुजय विखेंना टोला

0
35

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामती आणि नगर येथील निवडणूक प्रतिष्ठेची आणि लक्षवेधी ठरली होती. या दोन्ही लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. यातील नगरचे उमेदवार निलेश लंके पहिल्यांदाच संसदेत जात आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीत सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यात विविध मुद्द्यांवर प्रचार रंगला होता. यावेळी विखे यांनी लंके यांना इंग्रजी येत नसल्याचा मुद्दा चर्चेचा केला होता. याबाबत लंके यांनीही प्रश्न विचारले जात होते. आता लंके यांनी इंग्रजी बोलत विखे यांना जबरदस्त प्रत्युत्तर दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा 25 वा वर्धापन दिन सोहळा नगरमध्ये झाला. यावेळी, शरद पवारांसह अनेक मान्यवरांची भाषणे झाली. त्यावेळी निलेश लंकेंनी विखे पाटील यांना जबरदस्त टोला लगावला. कोणाचाही नाद करा, पण पवार साहेबांचा नाद करायचा नाही, असे म्हणत लंके इंग्रजी वाक्य म्हणाले. त्यावर ‘ये तो ट्रेलर है, विधानसभा अभी बाकी है’ असे म्हणत पवार यांनी फटकेबाजी केली.

नाद करायचा पण पवार साहेबांचा नाही बाळांनो, भले भले थकले. पवार इज द पॉवर… असे इंग्रजी वाक्य म्हणत निलेश लंकेंनी थेट सुजय विखेंवर निशाणा साधला. सुजय विखेंनी निवडणूक प्रचारादरम्यान लंकेंवर टीका करताना, त्यांना इंग्रजी बोलता येत नसल्यावरुन खिल्ली उडवली होती. संसदेत जायचं म्हटल्यावर इंग्रजी बोलता आलं पाहिजे, असेही ते म्हणाले होते. त्यामुळे, नगरच्या लोकसभा निवडणुकीत इंग्रजी भाषेचा मुद्दा चांगलाच गाजला होता. राष्ट्रवादीच्या मेळाव्यात निलेश लंकेंनी इंग्रजी भाषेचा वापर करत विखेंची बोलतीच बंद केली आहे.

निलेश लंके म्हणाले, मी जे बोलतो ते करून दाखवतो. मी विकेट काढतो, मी खासदार झालो तेव्हा अनेकांना विचारलं खरंच खासदार झालो का ? पण साहेबांमुळे खासदार झालो. तुम्ही मला दिल्लीत नेऊन टाकले. जर संसदेत शेतकऱ्यांना न्याय दिला नाही, तर संसद बंद पाडतो, आमचं काम हटके आहे. बघा हे आचारसंहिता आपल्याला कळत नाही. एकदा दिल्लीला जाऊन येतो, अंदाज घेऊन येतो कसा काय ते? निम्मा अंदाज घेऊन आलोय. आपण काम करणारा माणूस आहे. एकच ध्यानात ठेवा, पवार इज पॉवर आहे, असंही निलेश लंके यांनी सांगितलं.

Spread the love