तीर्थस्थानांची रंजक माहिती देणारे पुस्तक

0
46

तीर्थक्षेत्रांची ही सफर वैदिक युगापासून सुरू होते. शब्दमर्यादेमुळे इथे निवडक 15 स्थानांविषयी लिहिणे भाग आहे. गंगाकाठच्या वारासणींचं स्थानं आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं आहे, कारण ती देवनगरी आहे. या नगरीविषयी खूप वेगळी माहिती इथे मिळते. काशी ही हिंदू, बौद्घ, जैनांसाठी पवित्र नगरी आहे. तसेच सुफी परपंरेच्या मुस्लिमासांठी पवित्र आहे. हिंदूंसाठी पवित्र कारण इथं शिव, शक्तीदेवी आणि विष्णू वास करतो. बौद्घांना सारनाथच्या जवळ म्हणून प्रिय, तर जैनांना पवित्र वाटते कारण, त्यांचे चार तीर्थकार या नगरीत जन्मले. जम्मूच्या डोंगरातील वैष्णोदेवी हे यात्रेकरूंचे लोकप्रिय स्थळ आहे. ही देवता शाकाहारी देवी म्हणून पूजली जाते. पौराणिक परंपरांनुसार देवीस रक्ताचा नैवेद्य दाखवून पूजा करायला हवी, कारण नवरात्र वगैरे सणांच्या वेळी देवी दैत्यांशी लढते, तेव्हा तिला बकरी-कोंबड्यांचा बळी देण्याची प्रथा आहे; परंतु वैष्णोदेवीच्या ठिकाणी असं काही घडत नाही. वैष्णोदेवी ही दक्षिण भारतातली राजकन्या होती, तिला राजाशी विवाह करण्याची इच्छा होती. प्रभू राम एकपत्नी. त्यांनी नकार दिल्यामुळे ती पर्वतावर गेली आणि संन्यस्त जीवन जगू लागली. शिवपूजक रावणाने तिला पत्नी बनवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने चितेत उडी घेतली आणि वैष्णोदेवी म्हणून तिचा पुनर्जन्म झाला, अशी आख्यायिका आहे. कृष्णाची द्वारका, जी मोक्ष आणि स्वर्ग ही द्वारे उघडते म्हणून गुजरातमधील द्वारकाधीश मंदिरात मोक्षद्वार आणि स्वर्गद्वार अशी दोन द्वारे आहेत. कृष्णाला द्वारकाधीश म्हटलं जात असलं, तरी तो द्वारकेचा राजा नाही तर रक्षणकर्ता होता, कारण यादवांचा राजा या कल्पनेवर विश्‍वास नव्हता. द्वारकेचा कृष्णाला रणछोडदास म्हणजे युद्घातून पळू गेलेला असंही म्हटलं जातं. इथल्या कुठल्याही मंदिरात कुष्णाला राधेशी जोडत नाहीत. राधेची लोकप्रियता गंगेच्या मैदानी प्रदेशात, बंगाल आणि ओडिशा इथेच आहे, अशी महत्त्वाची माहिती लेखक देतो.

यानंतर आपण 2,500 वर्षांपासून पुढच्या अम युगात येतो. कर्नाटकमधील हसन जिल्ह्यातील श्रवणबेगोळे हे महत्त्वाचे तीर्थस्थान. विंध्यागिरी या टेकडीवर उघड्यावर उभी अशी जगातील सर्वात उंच म्हणजे 57 फूट उंचीची बाहुबलीची मूर्ती इथे आहे. त्याची कथा अशी- बाहुबलीने राज्यासाठी आपला ज्येष्ठ भाऊ भरताशी युद्घ पुकारलं. पुढे त्याला उपरती होऊन तो तपश्‍चर्येस बसला. त्याला प्रचंड ज्ञान मिळालं. त्यानंं अहंकाराचाही त्याग केला आणि जैनांमधील अत्यंत आदरणीय मुनी बनला. त्यानंतर येते पाटणा शहरापासून 100 किमी अंतरावरील बौद्घ धर्मींयासाठी पवित्र असलेले ठिकाण म्हणजे बोधगया. बोधगयेतील बौद्घ मंदिराचे व्यवस्थापन सर्व जगभरातील बौद्घ धर्मीयांचे आहे आणि यूनोस्कोने बोधगयेस जागतिक वारशाचे स्थळ म्हणून घोषित केले आहे. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी भारतातील कुणालाच बौद्घ धर्माची कल्पना नव्हती. विशेष म्हणजे, बुद्घ हा श्री विष्णूचा अवतार होता. पुराणात तसा उल्लेखही आहे. ब्रिटिश इतिहासकार आणि उत्खननतज्ज्ञांनी बौद्घ धर्माच्या पुनर्शोधात महत्त्वाची भूमिका निभावली. अशी दुर्मीळ माहिती लेखक देतो. पुढचा पौराणिक काळ 1500 वर्षांपासूनचा मदुराईच देखणं मीनाक्षी मंदिर हे महत्त्वाचं तीर्थस्थान आहे. दक्षिणेतल्या मदुराई येथून उत्तरेस कैलास पर्वताकडे पतीच्या शोधासाठी निघालेल्या मीनाक्षी राणीची कथा इथे वाचायला मिळते. मीनाक्षी मंदिर तामिळनाडूतील भव्य मंदिरांपैकी एक असून ते 14 एकरांवर बसलेलं आहे. त्यात 14 गोपुरे आहेत. सध्या मंदिर 500 वर्षांहून अधिक जुने असून ते नायक राजांनी बांधले. मंदिरातील मार्गिकामध्ये आणि मनोऱ्यात 33 हजारांहून अधिक मूर्ती आहेत. मंदिरात एक हजार स्तंभाचा दिवाणखाना आहे, असे हे मीनाक्षी अम्माचं भव्य मंदिर. ओडिशातील पुरी येथील जगन्नाथाचं मंदिर अनेक भाविकांसाठी महत्त्वाचं आहे. इथल्या दैवतांचा कृष्णाशी संबंध असला तरी स्थानिकांसाठी तो विष्णू म्हणजे जगाचा पोषणकर्ता आहे. शाक्त, शैव, बौद्घ आणि जैन असे वेगवेगळ्या पंथांचे लोक देवाकडे वेगवेगळ्या रूपात पाहतात. ऐहिक जगावर दिलेला भर हे या मंदिराचे लक्षवेधी वैशिष्ट्य आहे. इथला हा देव जलयात्रेसाठी आणि रथयात्रेसाठी जातो. पत्नीशी भांडतो. एका विधीत माता-पित्याचं श्राद्घ घालतो. त्यामुळे जगाचा हा जगन्नाथ आहे. याचं स्मरण आपल्याला इथं होतं. याच काळातलं तिरुपती हे महत्त्वाचं तीर्थस्थळ. तिरुपती म्हणजे लक्षमी-विष्णू होय. लक्ष्मीशी मतभेद होऊन विष्णू वैकुंठ सोडून पृथ्वीवर आले. त्याने आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील सात टेकड्यांचा परिसर राहण्यासाठी निवडला आणि सातव्या टेकडीवर वस्ती केली. सातव्या टेकडीचं नाव वेंकटाचलम आहे म्हणून त्यास वेंकटेश्‍वर असंही म्हटलं जातं. भक्त तिरुपतीच्या चरणी मोठी संपत्ती अर्पण करतात आणि हे देवस्थान अति श्रीमंत हिंदू मंदिरापैकी एक बनलं. मात्र, ऋण फेडायचं राहून जातं आणि विष्णू देव पृथ्वीवर तसेच अडकून पडतात, अशी ही कथा आहे.

पुढे तांत्रिक युगातील (1000 वर्षांपासून पुढे) तीर्थस्थानं येतात. यात देवी केंद्रस्थानी आहे. यातले वैशिष्ट्यपूर्ण मंदिर म्हणजे हिरापूरचे वर्तुळाकार मंदिर. भारतात इस्लामचं आगमन होण्यापूूर्वी पूर्णत: स्त्रीत्वास वाहिलेली मंदिरे होती. ती म्हणजे योगिनींची वर्तुळाकार मंदिरे. अशी पाच मंदिरे आजमितीस टिकून आहेत. दोन ओडिशात (हिरापूर आणि राणीपूर) तर तीन मध्यप्रदेशात आहेत. वर्तुळाकार मंदिराचं प्रवेशद्वार विहिरीसारखं असते आणि तिथल्या देवी सर्व दिशांना तोंडू करून उभ्या असतात. हिरापूर येथील मूर्तीमध्ये विविध भावमुद्रेतील स्त्रिया दाखवल्या आहेत. इस्लामी युगातील (800 वर्षांपासून) अमृतसर हे महत्त्वाचं तीर्थस्थान आहे. इथल्या मानवनिर्मित तळ्याच्या मध्यभागी हरमंदिर (सुर्वणमंदिराचं औपचारिक नाव) हे शाश्‍वत स्थान आहे. तळं म्हणजे सरोवर किंवा सर आणि त्यातलं पाणी मानवाला अमरत्व देणार अमृत आहे. देशाच्या सीमारेषापाशी उदय पावलेल्या शीख धर्मावर हिंदू-मुस्लीम हा दोन्ही धर्माचा प्रभाव आहे. शीख धर्माने कायम गृहस्थाश्रमी जीवनास संन्यस्थ जीवनापेक्षा सरस मानलं. तसेच लिंग समानतेबाबत विचार मांडले, अशी माहिती लेखक इथे देतो. भक्तियुगात (700 वर्षांपासून) पंढरपूर आणि बद्रिनाथ ही महत्त्वाची तीर्थस्थाने आहेत. 800 वर्षांपासून सुरू झालेल्या भक्तिमार्ग चळवळवीचे पंढरपूर हे केंद्र. इथे कृष्णापुढे स्थानिक स्तरावर पांडुरंग वा विठ्ठल नावाच्या देवापुढे नतमस्तक होण्यासाठी हजारो भाविक येतात. विठ्ठल शब्दाची व्युत्पत्ती गूढ आहे. विठ् हा व्ािष्णूचा अपभ्रंश आहे की, विटेवर उभा म्हणून विठ्ठल महटलं आहे, हे काहीसे गोंधळात टाकणारे आहे. बद्रिनाथ आणि केदारनाथ ही उत्ताराखंडमधील दोन्ही स्थळं आद्य शंकराचार्य यांच्याशी संबंधित आहेत. त्यांनी बौद्ध-हिंदू धर्माची (ज्ञानपणे) सांगड भावनिक हिंदू धर्माशी (भक्तिमार्गे) घातली आणि गंगोत्री-यमुनोत्री आणि बद्रिनाथ-केदारनाथ अशी छोटी चार धामयात्रा आखली. बद्रिनाथ आणि केदारनाथ ही ठिकाणे महाभारताशी जोडली गेली आहेत. युरोपियन युगातील (400 वर्षांपासून) लोटस टेंपल म्हणजे बहाई पंथाचं तीर्थस्थान आहे. इथल्या इमारतीला नऊ पायऱ्यांची तीन वर्तुळे आहेत आणि एकच देव (निर्माता) एकच वैश्‍विक धर्म आणि एक मानवता यांच्याशी संबंधित आहेत. बहाई धर्माचा प्रसार 200 देशांत झाला असून, भारतासह अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी अशा आठ देशांत त्यांची प्रार्थनास्थळे आहेत.

Spread the love