तिहेरी तलाकवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे मुस्लिम महिला अधिक सुरक्षित झाल्या आहेत. दरम्यान आगामी रक्षाबंधन सण भाजप खासदारांनी अल्पसंख्यांक समुदायापर्यंत जाऊन मुस्लिम भगिनींसोबत साजरा करावा; असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या खासदारांना केले आहे, असे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ ने दिले आहे.
सोमवारी रात्री पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंडमधील भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या खासदारांशी झालेल्या बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी हे वक्तव्य केले. यावेळी पीएम मोदी आणि भाजपच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांनी समाजातील विविध घटकांसाठी केंद्र सरकार राबवत असलेल्या विकास उपक्रमांवर प्रकाश टाकला. या बैठकीला उपस्थित असलेल्या काही खासदारांनी सांगितले की, पक्ष समाजातील प्रत्येक घटकाशी संपर्क साधण्यावर भर देत आहे. तसेच पसमांदा मुस्लिमांपर्यंत देखील पक्ष पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याचेही खासदारांनी या बैठकीदरम्यान स्पष्ट केले.
मुस्लिम महिलांसाठी मोदी सरकरच्या अनेक उपाययोजना
तिहेरी तलाक संदर्भातील विधेयक मंजूर
मुस्लिम महिला (विवाहावरील अधिकारांचे संरक्षण) विधेयक २०१९ मध्ये संसदेने मंजूर केले आहे. याद्वारे तिहेरी तलाकची प्रथा बेकायदेशीर असून, याप्रकरणी पतीला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकेल असा गुन्हा असल्याची चर्चा देखील या बैठकीत झाली.
केंद्र सरकारकडून हज यात्रा धोरणात मुस्लिम महिलांसाठी बदल
भाजप खासदाराच्या बैठकीदरम्यान मोदी सरकारच्या मुस्लिम महिलांसाठी करण्यात आलेल्या सुधारणा उपायांवर प्रकाश टाकण्यात आला. आपल्या नुकत्याच झालेल्या ‘मन की बात’ संबोधनात त्यांनी नमूद केले होते की, यावर्षी 4,000 हून अधिक मुस्लिम महिला ‘मेहरम’शिवाय हज करतील. हे मुस्लिम महिलांच्या दृष्टीने एक “मोठे परिवर्तन” आहे. यामुळे अधिकाधिक महिलांना वार्षिक हज यात्रेला जाण्याची संधी मिळत असल्याचे प्रतिपादन देखील पीएम मोदींनी केले. गेल्या काही वर्षांत त्यांच्या सरकारने हज धोरणात केलेले बदल यामुळे अनेक मुस्लिम स्त्रिया आणि पुरूषांना ही संधी मिळाली आहे.