कवी अनंत राऊत यांचे 15 डिसेंबर रोजी कुऱ्हे पानाचे येथे काव्यगायन आणि व्याख्यान

0
9

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हा पानाचे येथे महाराष्ट्राच्या काव्यविश्वातील मानाचे नाव,मैत्रीच्या गोडव्याचेशब्दशिल्पकार, हास्यकवी आणि व्याख्याते अनंत राऊत यांच्या काव्यगायन व व्याख्यानाचा कार्यक्रम रविवार, 15 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 3.30 वाजता रेणुका माता मंदिर हॉल, कुऱ्हे पानाचे येथे होणार आहे.

गावं मित्र परिवार व आई प्रतिष्ठान कुऱ्हे पानाचे आयोजित या कार्यक्रमात कवी अनंत राऊत आपल्या खास शैलीत “भोंगा”, “मायबाप” आणि “मित्र वणव्यात गारव्यासारखा” यांसारख्या गाजलेल्या रचना सादर करणार आहेत. हास्याचा गारवा आणि विचारप्रवर्तक शब्दफुले यांच्या संगमातून रसिकांना नव्या उमेदीने प्रेरणा मिळणार आहे.

सध्याच्या तणावपूर्ण जीवनात हास्यरसासह मैत्रीचे महत्त्व उलगडून दाखवणारा हा कार्यक्रम रसिकांसाठी एक सुवर्णसंधी ठरेल. जीवनावरचे मार्मिक भाष्य आणि अनंत राऊत यांच्या ओजस्वी कविता श्रोत्यांच्या हृदयाला निश्चितच स्पर्श करतील.

“वॉटर कुलर लोकार्पण सोहळा”

कार्यक्रमापूर्वी रा. धो. माध्यमिक विद्यालय (पूर्वीचे न्यू इंग्लिश स्कूल) येथे 1986-87 च्या दहावीच्या बॅच तर्फे विद्यार्थ्यांसाठी आर.ओ. यंत्रासह दोन वॉटर कुलरची भेट देण्यात येणार आहे. या वॉटर कुलरचे लोकार्पण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल.

या मान्यवरांची राहणार उपस्थिती

सदर कार्यक्रमासाठी डी. वाय. एस. पी. कृष्णांत पिंगळे, माजी जि. प. सदस्य समाधान पवार, हायस्कूलचे चेअरमन एकनाथ आप्पा बडगुजर, सरपंच कविता उंबरकर, विकास सोसायटीचे चेअरमन रवींद्र गांधेले, हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. पी. चौधरी सर, आजी माजी सरपंच व ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व इतर मान्यवर उपस्थतीत राहणार आहे.

तरी सर्वांनी मित्रमंडळींसह आणि काव्यरसिकांनी आपल्या परिवारासह कार्यक्रमाला उपस्थित राहून हा अविस्मरणीय सोहळा अनुभवावा, असे नम्र आवाहन गावं मित्र परिवार व आई प्रतिष्ठान कुऱ्हे पानाचे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Spread the love