चोपडा (प्रतिनिधी) तालुका शेतकरी सहकारी संघाचे माजी प्रेसिडेंट व अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे जेष्ठेनेते स्वर्गीय ताराचंद भावडू बाविस्कर (वडगांवसिम) यांच्या स्मरणार्थ गरीब व गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. अ.भा.को.स.संघटना (रजि.) नवी दिल्ली (शाखा महाराष्ट्र) चे प्रदेश सचिव अनिलकुमार नन्नवरे (बांभोरीकर) यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते.याप्रसंगी संघटनेचे इतरही पदाधिकारी कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.
स्वर्गीय ताराचंद बाविस्कर हे विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांचे खंदे समर्थक होते. सामाजिक कार्यासोबत नि:स्वार्थी राजकारणी म्हणून त्यांना मिनी आमदार म्हणुनही ओळखले जायचे. ते वडगावसिम कोळंबा ग्रुप ग्रा.पं.चे माजी सरपंच व जयगुरूदेव माध्य.विद्यालयाचे संस्थापक सदस्य तसेच चोपडा येथील म.वाल्मिकी गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष तर कोळी बोर्डिंगचे सदस्यही होते. तालुक्याचे माजी आमदार कैलास जी.पाटील यांच्या विधानसभा निवडणुकीच्या विजयात त्यांचा सिंहाचा वाटा होता. तालुक्यातील प्रत्येक गावागावात त्यांचा मोठा लोकसंग्रह होता. त्यांना भेटावयास येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यास ते काजू बादाम व चॉकलेटचा प्रसाद देत असत. ते विनोदी स्वभावाचे असल्याने त्यांच्या तोंडी नेहमी “खदरबदर” हा शब्द यायचा म्हणुन त्यांना हक्काने व प्रेमाने खदरबदर पुढारी म्हणुन बोलले जायचे.तालुक्यातील हज्जारों लोकांना ते गांव व नावाने ओळखायचे.अशी माहिती चोपडा तालुका कोळी समाजाचे संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर (गोरगांवले बु.) यांनी ह्या पत्रकान्वये दिली आहे.