सोनी नगरात शिवजयंतीनिमित्त डॉ. मिलिंद बागुल, डॉ. सत्यजित साळवे, बापुराव पानपाटील यांचे प्रबोधन

0
62

जळगाव – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोनीनगर सावखेडारोड,पिंप्राळा परिसरातील महागौतमी महीला संघ यांच्या विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला डॉ. मिलिंद बागुल,डॉ. सत्यजित साळवे, बापुराव पानपाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला वैभवी नाबरीया हिने शिवाजी महाराजांची घोषणा दिली.

यावेळी शिवचरित्रातून काय शिकावे या विषयावर बोलतांना डॉ. सत्यजित साळवे यांनी सांगितले की, सिद्दी जौहरने पन्हाळगडाला वेढा टाकला तेव्हा वेढा जास्त दिवस टिकून होता. यामुळे शिवाजी महाराज चिंतेत पडले. त्यांनी सिद्दी भेट घेण्याचे ठरविले. त्यानुसार आपला विश्वासू साथीदार शिवाजी काशीद याला त्यांनी शिवाजी महाराज म्हणून सिद्दीच्या भेटीला पाठविले. शिवाजी भेटीला येत असल्याचे समजल्यामुळे त्याचे सैन्य गाफील राहिले. याचवेळी शिवाजी महाराजांनी चलाखी करत संधी साधत सिद्दीच्या सैन्यावर हल्ला केला. याचवेळी इकडे शिवाजी काशिदला पकडण्यात आले. त्याला खोदूनखोदून विचारण्यात आले. पण त्याने अखेरपर्यंत आपण शिवाजी असल्याचे सांगितले. अखेर त्याला वधस्तंभावर बांधले. छातीला भाले लावले तरीही त्याने आपण शिवाजी असल्याचे सांगितले. त्याच्या छाती आणि पोटात भाले खुपसले तेव्हा खाली घसरत शिवाजी म्हणाला की, खोट्या शिवाजीची सुध्दा तुम्हाला पाठ दिसली नाही. तर खरा शिवाजी तुम्हाला कसा दिसेल. शिवाजी काशिद, बर्हिजी नाईक, तानाजी मालुसरे या लोकांना काही मोठा खजिना मिळाला नाही. पण त्यांना प्रेम मिळाले, प्रेरणा मिळाली. शिवाजीचे राज्य गरीबांचे, उपेक्षितांचे राज्य होते. त्यांनी कुणालाही उघड्यावर पडू दिले नाही. हा संदेश आत्ताच्या राज्यकर्त्यांनी शिवचरित्रातून घ्यायला हवा असेही डॉ. साळवे यांनी सांगितले.

डॉ मिलिंद बागुल यांनी सांगितले की,इतिहास म्हणजे भूतकाळाचा वर्तमान काळशी चालेला सुसंवाद असून या वर्तमान काळातही आपल्या हातून इतिहास घडत असतो. परंपरा आणि आधुनिकता सृजनांना जन्म देत असते. मात्र त्या परंपरेची जाण आणि भान आपण राखले पाहिजे. कारण चुकीचा इतिहास समाजात अंधश्रध्दांना जन्माला घालण्याचे काम करीत असतो.

छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ हिंदवी स्वराज्याची स्थापना केली नाहीतर माणसाला जगण्याचा मंत्र दिला. असे प्रतिपादन बापुराव पानपाटील यांनी केले. पुढे म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र उलगडून सांगितले. त्यात त्यांनी हिंदवी स्वराज्यांची स्थापना करुन गरीब जनतेला न्याय मिळवून दिला. जीवनातील प्रत्येक प्रसंगाना ते धैर्याने समोरे गेले, कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांचा आदर्श आजच्या पिढीने घ्यावा. असे आवाहनही त्यांनी केले. सुत्रसंचालन नरेश बागडे, यांनी तर आभार विनोद निकम यांनी मानले.

याप्रसंगी अजय बागडे,यशवंत पाटील,सरदार राजपुत, नारायण येवले , देविदास पाटील, विजय चव्हाण, भैय्यासाहेब बोरसे, विठ्ठल जाधव, प्रकाश जाधव, निलेश जोशी, उदय महाले, गौतमीमहीला संघ अध्यक्ष संगिता भालेराव,आशा बागडे, नंदिता जोशी, ज्योती निकम, योगिता पाटील, संगिता कोळी,सुनिता राजपूत, सिंधुताई जाधव, भारती जाधव, पुनम जाधव, वंदना बांगर, मंगला सोनवणे, मिना हिवाळे, सोनाली सोनावणे,अहीरेताई, लोखंडेताई यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love