बांगलादेशच्या राजकारणात ट्वीस्ट! तुरुंगात असलेल्या माजी पंतप्रधानांना मुक्त करण्याचे राष्ट्रपतींचे आदेश

0
27

शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर देश लष्कराच्या अधिपत्याखाली आहे. लष्कर प्रमुखांनी पत्रकार परिषद घेत अंतरिम सरकार स्थापन करणार असल्याचं म्हटलं आहे.

दुसरीकडे बांगलादेशमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय. तुरुंगात असलेल्या माजी पंतप्रधान खालिदा झिया बाहेर येणार आहेत.

‘इंडिया टूडे’ने दिलेल्या वृत्तानुसार माजी पंतप्रधान खालिया झिया यांची तुरुंगातून मुक्तता करण्याचे आदेश राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी सोमवारी दिले. विरोधी पक्षांच्या सदस्यांसोबत झालेल्या एका बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

बेगम खालिदा ह्या बांगलादेश नॅशनालिस्ट पार्टीच्या अध्यक्ष आहेत. त्यांना तात्काळ मुक्त करण्याचे आदेश राष्ट्रपतींनी दिले आहेत. खालिदा ह्या प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्या आहेत. हा पक्ष शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचा प्रमुख विरोधक आहे. खालिदा यांना हसीना यांचं कट्टर विरोधक मानले जाते.

बांगला देशातील उग्र आरक्षणविरोधी आंदोलनामुळे पंतप्रधानपदाचा राजीनामा देत देश सोडून पळ काढाव्या लागलेल्या शेख हसीना या भारतात आश्रयाला आल्या आहेत. आज सायंकाळी शेख हसीना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य असलेले विमान राजधानी दिल्लीलगतच्या गाझियाबादच्या हिंडन हवाईतळावर उतरले. हसीना यांना ४९ वर्षानंतर पुन्हा भारतात आश्रय घेणे भाग पडले आहे.

हसीना यांच्या भारतातील आगमनावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली असून हसीना यांच्या सुरक्षित निवासाची व्यवस्था करण्यात येत आहे. बांगला देशातून आपल्या कुटुंबियांसह अजॅक्स-१४३१ या विमानातून पळ काढल्यानंतर शेख हसीना कोणत्या देशात आश्रय घेणार, याविषयी सुरुवातीला उलटसुलट चर्चा सुरु होती. पण सरतेशेवटी दिल्लीत तात्पुरता आश्रय घेऊन लंडनला जाण्याच्या इराद्याने शेख हसीना यांचे विमान हिंडन हवाई तळावर उतरले.

हिंडन हवाईतळावरील हवाईदलाच्या अधिकाऱ्यांनी शेख हसीना यांचे स्वागत केले. हसीना यांचे सी-१३० वाहतूक विमान भारतीय हवाई क्षेत्रात दाखल होताच भारतीय वायुदल आणि सुरक्षा संस्थांच्या देखरेखीखाली त्यांचे विमान गाझियाबादमध्ये सुरक्षित उतरले.

हिंडन हवाई तळावर विमान उतरल्यानंतर शेख हसीना बराच वेळ तिथेच थांबल्या. भारत सरकारला शेख हसीना यांच्या निवासाची व्यवस्था राजधानी दिल्लीतच करावी लागणार आहे. हसीना यांनी ब्रिटनमध्ये आश्रय मिळावा म्हणून विनंती केली असून त्यावर ब्रिटनने अद्याप स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे पुढची स्थिती स्पष्ट होईपर्यंत हसीना काही दिवस दिल्लीतील सुरक्षित स्थळी मुक्काम करावा लागणार आहे.

Spread the love