‘पुष्पा २’च्या प्रीमियरला महिलेचा मृत्यू! अल्लू अर्जुनकडून कुटुंबाला २५ लाखांची मदत जाहीर; म्हणाला-

0
20

‘पुष्पा २’ची सध्या चांगलीच हवा आहे. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करायला सुरुवात केलीय. ‘पुष्पा २’च्या यशाला पहिल्याच दिवशी गालबोट लागलं.

हैदराबाद येथे ‘पुष्पा २’चा प्रीमियरला झाला होता. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर तिचा मुलगा जखमी झाला. या घटनेनंतर अल्लू अर्जुनवर गुन्हा नोंदवला गेला. अखेर या दुर्घटनेवर अल्लू अर्जुनने मौन सोडलंय.

अल्लू अर्जुन काय म्हणाला?

‘पुष्पा २’ फेम अल्लू अर्जुनने ट्विटर X वर व्हिडीओ शेअर करत सांगितलंय की, “या कठीण काळात मी त्या महिलेच्या कुटुंबासोबत उभा राहीन. त्या कुटुंबासाठी जे शक्य होईल ते मी करेन. मी त्यांना २५ लाखांची नुकसानभरपाई देण्याचं जाहीर करतोय. याशिवाय उपचाराच्या सर्व खर्चाची मी मदत करेन.” अशाप्रकारे अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर भावुक प्रतिक्रिया देत मृत महिलेच्या कुटुंबाला धीर दिलाय. याशिवाय त्यांना आर्थिक मदत जाहीर केलीय.

काय होती ती दुर्घटना?

दिलसुखनगर येथे राहणारी महिला रेवती तिचे पती भास्कर आणि दोन मुलं श्रीतेज (९) आणि संविका (७) यांच्यासोबत ‘पुष्पा २’च्या प्रीमियरला उपस्थित होती. प्रीमियरच्या वेळेस गर्दीत असलेल्या लोकांनी गेट तोडण्याचा प्रयत्न केल्याने मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला. चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाल्याने यात रेवती आणि तिचा मुलगा श्रीतेज बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी दुर्गाबाई देशमुख हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी रेवती यांना मृत घोषित केलं.

Spread the love