स्त्रियांनी राजकारणात यावं; मनसे संधी देण्यास उत्सुक, महिला दिनानिमित्त राज ठाकरेंचं खास पत्र

0
11

जागतिक महिला दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी फेसबुकवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी स्त्रीवर्गाला महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच स्त्रियांनी राजकारणात यावं, त्यांना संधी देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्सुक आहे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

राज ठाकरे यांनी त्यांची ही फेसबुक पोस्ट ट्विटरवर शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, आज जागतिक महिला दिन. सर्वप्रथम तमाम स्त्रीवर्गाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मन:पूर्वक शुभेच्छा. सगळय़ा चौकटी मोडून, आज सर्वच क्षेत्रामंध्ये स्त्रियांची जी घौडदौड सुरू आहे ती थक्क करणारी आहे. आज ग्रामीण भागातील असो की शहरी भागातील, इथल्या मुलींना उच्च शिक्षणाची, स्वतःच करिअर घडवायची प्रचंड ओढ आहे. आणि त्यासाठी त्या घरापासून लांब, इतर शहरांत किंवा परदेशांत नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने सहज स्थिरावत आहेत, आणि जिथे जातील तिथे स्वतःचा ठसा उमटवत आहेत. हे चित्र आनंददायी आहे.

100, 150 वर्षांपूर्वी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळावा, म्हणून प्रचंड संघर्ष करावा लागत होता अशी परिस्थिती होती. आणि त्याच समाजात मोठमोठय़ा उद्योगसमूहांच्या व्यवस्थापनापासून ते जागतिक अर्थकारणात उलाढाली करणाऱ्या संस्थांमध्ये मोठय़ा पदांवर स्त्रिया कार्यरत आहेत. इतकंच काय देशाची अर्थव्यवस्था, परराष्ट्र व्यवहार, सीमांचं संरक्षण ते थेट राष्ट्रपतीपदी स्त्रिया आपला ठसा उमटवत आहेत. आणि हे सर्व त्यांनी निव्वळ स्वकर्तृत्वावर कमावलं आहे.

म्हणूनच आता स्त्रियांनी आता राजकारणात देखील मोठय़ा प्रमाणावर यायला हवं. ‘जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणं’ हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ध्येय आहे, आणि हे साध्य करायचं असेल तर स्त्रियांचा सहभाग देखील तितकाच महत्वाचा आहे, ह्याची आम्हाला जाणीव आहे. म्हणूनच विविध क्षेत्रांत स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्त्रियांनी राजकारणात यावं, त्यांना संधी देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्सुक आहे. पुन्हा एकदा सर्व महिलांना मनःपूर्वक शुभेच्छा. असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Spread the love