माणिकराव कोकाटे यांची कृषिमंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आलीय. मात्र, त्यांना मंत्रिमंडळाबाहेर न काढता, खातेबदल करून क्रीडा व युवक कल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आलीय.
तर कृषी खात्याची जबाबदारी दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आलीय.
काल (31 जुलै) रात्री उशिरा माणिकराव कोकाटेंकडून कृषी खातं काढून दत्तात्रय भरणेंकडे सोपवण्यात आल्याची अधिसूचना राज्याच्या सामान्य प्रशासन विभागानं जारी केली.
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना, राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळ सभागृहातच ऑनलाईन रमी खेळतानाचे व्हीडिओ समोर आले होते. त्यानंतर कोकाटे आणि राज्य सरकारवर सर्व स्तरातून टीकेचा भडीमार सुरू झाला होता. तसंच, कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात होती.
‘रमी प्रकरणावरून’ वरून लातूरमध्ये झाला होता राडा
माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्य आणि विधिमंडळात रमी खेळण्यामुळे शेतकरी आणि जनतेच्या मनात संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे विरोधकांकडून आणि शेतकरी संघटनांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती.
याच मागणीसाठी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेमध्ये पत्ते उधळत आंदोलन केलं आणि “कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा” अशी मागणी केली.
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे यांना मारहाण केली होती. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
या प्रकरणाचे पडसाद राज्यभर अनेक ठिकाणी उमटल्याचं पाहायला मिळाले होते.