रवी आणि नवनीत राणांविरूद्ध गुन्हा दाखल, ताब्यात घेण्यासाठी आलेल्या पोलिसांसोबत दाम्पत्याची हुज्जत

0
17

रवी राणा आणि नवनीत राणा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यांना ताब्यात घेण्यासाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांशी त्यांनी हुज्जत घातली आहे. पोलिसांनी आधी वॉरंट दाखवावे आणि त्यानंतरच आम्हाला ताब्यात घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली. त्यासाठी त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली आहे. आमचीही तक्रार आहे, ती दाखल करून घ्या, आम्हालाही कायदा समजतो, असे सांगत ते पोलिसांशी हुज्जत घातल आहेत.अखेर पोलिसांनी त्यांना घराखाली आणले आहे आणि त्यांना गाडीत बसवत पोलीस ठाण्यात नेले आहे.

राणा दांपत्याने मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा केली होती. त्यांना रोखण्यासाठी शिवसैनिक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले होते. मातोश्रीसमोर त्यांनी कडक पहारा ठेवला होता. शिवसैनिकांचे हे रुप बघता, त्यांनी माघार घेतली, असे युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी सांगितले. खार येथील राणा दांपत्यांच्या घरासमोर जमलेल्या शिवसैनिकांशी त्यांनी संवाद साधला.

ते शुक्रवारी मातोश्रीवर येणार होते. त्यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी शनिवारी सकाळी 9 ची वेळ दिली. शिवसैनिक सकाळी 7 वाजेपासूनच तयारीत होते. 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले मातोश्री सोडा, त्यांना घराबाहेरही पडता आलेले नाही. अखेर दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेत त्यांनी सांगितले की, आमच्याकडून चूक झाली. शिवसेनेला नडणे आम्हाला झेपणारे नाही, हे त्यांनी मान्य केले. त्यामुळे मातोश्रीबाहेर पहारा देणाऱ्या सर्व शिवसैनिकांचे आपण अभिनंदन केले. त्यानंतर आपण दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत, असे सरदेसाई यांनी सांगितले.

राणा दांपत्याने शिवसेनेची आणि मातोश्रीची माफी मागावी, तसेच शिवसैनिकांना डिवचल्याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी असल्याचे ते म्हणाले. अपशब्द आणि प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेनेने खार पोलीस ठाण्यात राणा दांपत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राणे दांपत्यांना काही वेळात पोलीस ठाण्यात नेण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यावेळी कायदा-सुव्यस्थेला धोका पोहचणार नाही. याची प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. शिवसैनिकांकडून कोणेतही गैरकृत्य घडणार नाही, असेही सरदेसाई म्हणाले.

ते आपल्या गणतीत नाहीत. मात्र, त्यांच्या आडून राजकारण करणाऱ्यांना शिवसेनेनेच कायदा हातात घ्यावा, कायदा- सुव्यवस्था बाधित करावी, अशी इच्छा आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेला धोका पोहचेल, असे कोणतेही काम करू नका. त्यांनी आपल्याला आव्हान दिले होते. आपण ते समर्थपणे पेलले आहे. त्यांनी चूक मान्य केली आहे. आपण दोन दिवस कडक पहारा ठेवला. त्यातून आपण हे दाखवून दिले आहे की, मुंबई, महाराष्ट्र आणि देशात शिवसेना, मातोश्री आणि मुख्यमंत्रई उद्धव ठाकरे यांना आव्हान देणारा कोणीही नाही,असेही ते म्हणाले.

Spread the love