तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी काही दिवसांपूर्वी सनातन धर्मावर वादग्रस्त विधान केलं होतं. आता त्यात अभिनेते प्रकाश राज यांची भर पडली आहे. सनातन धर्म म्हणजे डेंग्युच असल्याचं प्रकाश राज यांचं म्हणणं आहे.
प्रकाश राज यांनी कलबुर्गी येथील एका कार्यक्रमादरम्यान उदयनिधी यांच्या विधानाचा पुनरुच्चार करताना म्हटलं की, सनातन हा डेंग्यु तापाप्रमाणे आहे आणि त्याला नष्ट करायला हवं. मुस्लीम वाहकाला टोपी उतरवण्यास सांगणं हे देखील तसंच आहे. सगळ्यांना आपला धर्म आचरणात आणण्याचा अधिकार आहे. या समाजात सगळ्यांना राहायचा अधिकार आहे. धार्मिक यात्रेत जय श्रीराम म्हणत तरुण चाकू आणि तलवारी घेऊन चालतात, हे पाहून मला खूप दुःख होतं. त्यांनी स्वतःच्या नोकरी आणि स्वप्नांविषयी विचार करायला हवा. मला आश्चर्य वाटतं की कोणी त्यांचा असा ब्रेनवॉश केला आहे. 8 वर्षांच्या मुलाला धर्माशी जोडणं ही कृती सनातन धर्माशी जोडलेली आहे. हा डेंग्यु तापासारखा आहे, ज्याला नष्ट केलं जायला हवं. आपण कोणत्या देशात राहतोय? बाबासाहेब आंबेडकरांमुळे या देशात अस्पृश्यता अवैध ठरली आहे. पण, लोकांची मानसिकता तशीच आहे, असं प्रकाश राज यावेळी म्हणाले आहेत.
यापूर्वी उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यु, मलेरिया यासारख्या आजारांशी केल्याने हा वाद निर्माण झाला होता. त्यांनी केलेल्या विधानानुसार, सनातन धर्माचा नुसता विरोध करून चालणार नाही, तर सनातन धर्माला समाप्त करायला हवं. सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समानतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींचा विरोध केला जाऊ शकत नाही. त्यांना संपवावचं लागेल. आपण, डेंग्यू, मच्छर, मलेरिया किंवा कोरोनाचा विरोध करू शकत नाही. आपल्याला त्याला संपवावं लागतं, तसंच आपल्याला सनातन धर्म संपवावा लागेल, असं वक्तव्य उदयनिधी स्टालिन यांनी केल्याने वाद निर्माण झाला होता. अनेक हिंदु संघटनांनी त्यांच्या या विधानाचा निषेध केला आहे.









