नागपुरात वाळू तस्करांचा मुजोरीपणा समोर आला आहे. विनापरवाना वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने कारवाई करण्यास गेलेल्या तलाठ्यावर ट्रॅक्टर चालवून जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
ही घटना नागपूर जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील मौजा खातखेडा गावातील वाळू घाटावर घडली आहे. याप्रकरणी आशिष काटेखाये (वय३५),पंकज काटेखाये (वय ३३) आणि एका अनोळखी व्यक्ती असे एकूण तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खातखेडा येथील नदी घाटावरून वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे यानंतर नायब तहसीलदार मयूर चौधरी, तलाठी बहुरे व किरण मोरे घटनास्थळी दाखल झाले.यावेळीनदी घाटातून विना नंबरचा ट्रॅक्टर बाहेर येताना दिसताच चालकाला थांबवून टॉर्चच्या साह्याने झाडाझडती घेण्यात आली. यावेळी ट्रॉलीमध्ये एक ब्रास वाळू दिसल्याने रॉयल्टी संदर्भात विचारणा करण्यात आली. या रेतीची रायल्टी नसल्याचे चालकाने सांगितल्याने ट्रॅक्टरच्या जप्तीची कारवाई करण्यास महसूल कर्मचारी सज्ज होताच चालकाने मालकाला दूरध्वनीद्वारे कळविले.
त्यानंतर ट्रॅक्टरचा मालक व अन्य एक व्यक्ती मोटारसायकलीने घटनास्थळी दाखल झाला. ‘तुम्ही माझा ट्रॅक्टर वारंवार कसा लावता? तुमचा बंदोबस्त लावतो’, असे म्हणून चालक आशिष काटेखाये, मालक पंकज काटेखाये व एका अनोळखी व्यक्तीने संगनमत करून घटनास्थळी असलेल्या तलाठी किरण मोरे यांचे अंगावर भरधाव वेगाने वाळूचा ट्रॅक्टर चालविला.
यात तलाठी मोरे यांच्या उजव्या पायाचे हाड मोडून गंभीर जखमी झाले. दरम्यान घटनास्थळावरून आरोपींनी पळ काढला. घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाच्या भरारी पथकाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी तलाठी मोरे यांना उपचारासाठी तात्काळ पवनी येथील रुग्णालयात दाखल केले. त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील दवाखान्यात हलविण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












